''सागरी रो-रो'' देणार पर्यटनाला ''बुस्टर''

''सागरी रो-रो'' देणार पर्यटनाला ''बुस्टर''

Published on

82760

‘सागरी रो-रो’ देणार पर्यटनाला ‘बुस्टर’
विजयदुर्ग बंदरात कामाला वेगः गणेशोत्सवाआधी सेवा सुरु होण्याची शक्यता
संतोष कुळकर्णीः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ः गणेशोत्सवासह पर्यटन हंगामावेळी मुंबईहून सिंधुदुर्गात वाहने घेऊन येणाऱ्यांसाठी सागरी रो-रो सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने वेगाने हालचाली सुरू आहेत. यासाठी ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील विजयदुर्ग बंदरामध्ये जलदगतीने काम सुरू आहे. प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यावर विजयदुर्गच्या स्थानिक पर्यटन विकासाला गती मिळू शकेल. यामुळे आगामी काळात किनारी भागातील वाहतुकीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विजयदुर्ग बंदारातील या सेवेमुळे लगतच्या राजापूर तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांनाही या सेवेचा लाभ होऊ शकतो.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. सामाजातील काही विशिष्ट घटकांची क्रयशक्ती वाढल्याने अनेकांकडे चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनांमुळे आपल्या सोयीनुसार प्रवास करणे सोपे जाते. अशावेळी पर्यटकही सार्वजनिक वाहतुक सेवेऐवजी चारचाकी किंवा खासगी वाहतुक सेवेला प्राधान्य देतात. मात्र, वाढती वाहने आणि रस्त्यांची अवस्था यामुळे वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते. पर्यायाने नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी काहीसा विलंब होतो. यामुळे आपोआपच वेळ आणि खर्चात वाढ होते. त्यामुळे मुंबईमधील चाकरमान्यांना वाहनांसह आपल्या गावी येण्यासाठी सागरी रो -रो सेवा हा नवा पर्याय समोर आला आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी अशी सेवा सुरू करण्याचा विचार पुढे आला आणि प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरूवातही झाली.
सिंधुदुर्गात विजयदुर्गची नैसर्गिक सुरक्षित बंदर म्हणून ओळख आहे. ऐतिहासिक काळापासून येथे जलवाहतुक चालायची. विजयदुर्गपासून वाघोटणपर्यंत विस्तीर्ण पसरलेली अशी खाडी आहे. शिवाय वाहतुकीसाठीही नैसर्गिक सुरक्षित बंदर असल्याने प्राधान्याने याचा विचार केला गेला असावा.
या अनुषंगाने कामाला सुरूवात झाली असून सध्या विजयदुर्ग बंदरात काम जलदगतीने सुरू आहे. जिल्ह्यात येणारी वाहने विजयदुर्ग बंदरात उतरून जिल्हाभरात जाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे समुद्रीमार्गे विजयदुर्ग बंदरात आलेली वाहने आपापल्या मार्गाने आपल्या इच्छितस्थळी मार्गस्थ होऊ शकतात. मुंबईहून सुटल्यावर साधारणपणे काही तासात वाहनांसह चाकरमानी जिल्ह्यात पोचतील असे सांगितले जाते. यामुळे भविष्यात जलवाहतुकीसाठी वाव असल्याचे दिसत आहे. यातून उद्योग व्यवसायासाठीचे नवे दालन खुले होऊ शकेल.

चौकट
४० वर्षानंतर बोट वाहतुक
पूर्वी सागरी मार्गाने माल आणि प्रवाशी वाहतुक सुरू होती. त्यावेळी स्वस्त आणि किफायतशीर वाहतुक म्हणून याला पसंती असे. मुंबई-गोवा महामार्ग अस्तित्वात येण्याआधी फोंडा-राधानगरी-कोल्हापूरमार्गे मुंबई असा लांबचा प्रवास असायचा. त्यामुळे सर्वसामान्यांकडून बोटसेवेला प्राधान्य असे. मात्र, १९८५ च्या सुमारास बोट वाहतुक बंद झाली आणि सागरी वाहतुक थांबली. यथावकाश रेल्वे सुरू झाल्याने अनेकांना त्याचा आधार वाटू लागला. आता पुन्हा वाहनांसह जलवाहतुक सुरू होत असल्यास जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठीची ही संधी आहे.

चौकट
दरांवरुन ठरणार गणिते
सागरी रो -रो सेवेसाठीचे शुल्क अजून जाहीर झालेले दिसत नाही. सध्या रेल्वेचीही रो-रो सेवा सुरू आहे. अशावेळी सोयीबरोबरच काय फायद्याचे याचे गणित सिंधुदुर्गवासिय निश्‍चितच घालतील. अशावेळी नेमकेपणाने सागरी रो-रो सेवेला किती पसंती मिळते हे समोर येईल. विजयदुर्गपासून आंबोलीच्या टोकाला जाणाऱ्या माणसांकडून याचा अधिक विचार होण्याची शक्यता आहे.

चौकट
असाही फायदा
रो -रो सेवेमुळे इंधन बचत, वाहन चालवण्याच्या त्रासातून मुक्तता, वाहतुक कोंडीपासून सुटका, टोलमधून मुक्ती, अपघातविरहित सुरक्षित प्रवास, नियोजितवेळी घरी जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचवेळी रो -रो सेवेमध्ये वाहन चढवताना वाहनांची सुरक्षितता हा मुद्दाही असू शकतो. त्यामुळे रेल्वे आणि सागरी सेवा याची सांगड घातली जावू शकते.

चौकट
स्थानिक व्यवसायला संधी
सागरी रो-रो सेवेमुळे सागरी पर्यटनाला मोठा वाव आहे. चाकरमान्यांबरोबरच पर्यटकही सागरी मार्गाचा अनुभव घेण्यासाठी याला पसंती दर्शवू शकतात. शिवाय विजयदुर्ग भागातील स्थानिक व्यवसाय वाढीला यातून संधी उपलब्ध होऊ शकते. बंदराचे गतवैभव यामुळे प्राप्त होण्यास मोठा वाव आहे. एकूणच किनारी भागाला यामुळे उर्जितावस्था येण्यास संधी आहे.

चौकट
महामार्गही सुस्थितीत व्हावा
सागरी रो-रो सेवा तसेच रेल्वेची रो -रो सेवा याचा लाभ घेण्याबरोबरच नियोजित मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम जलदगतीने पूर्णत्वास गेल्यास सोयीचे होऊ शकेल, असाही मतप्रवाह आहे. कोकणात येण्यासाठी हा मार्गही अधिक सोयीचा ठरू शकत असल्याने महामार्ग पूर्ण व्हावा, अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे.

कोट
82759
सागरी रो -रो सेवा सुरू होणे स्वागतार्ह आहे. ही सेवा कायमस्वरूपी सुरू रहावी. या सेवेमुळे येणारे पर्यटक स्थानिक पातळीवर स्थिरावल्यास यातुन अर्थाजनाला मोठा वाव आहे. यामुळे मुंबई अंतर जवळ येईल आणि व्यापार उद्योगाला चालना मिळेल. रो -रो सेवेच्या दिवसभरात किती फेऱ्या होतात यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ठरेल. मुंबईतून जिल्ह्यात येण्याबरोबरच येथूनही मुंबईला जाण्यासाठी संधी आहे.
- राजीव परूळेकर, शिवप्रेमी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com