''त्या'' जागेचा उपयोग जनहितासाठी करा
‘त्या’ जागेचा उपयोग
जनहितासाठी करा
कल्याणकरः बांदा टोल नाका प्रश्नी मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ः तब्बल अडीचशे कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा येथे उभारलेला टोल नाका सुरू करणे शक्य नसेल तर त्या ठिकाणी हॉस्पिटल, शाळा किंवा मार्केट यासारखे प्रकल्प सुरू करून ती जागा उपयोगात आणावी, अशी मागणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तपासणी नाक्यासाठी आजपर्यंत तब्बल अडीचशे कोटी रुपयाचा खर्च झाला. परंतु, तो सुरू न झाल्यामुळे जनतेचे आणि शासनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे याबाबत कोणता तरी सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणी कल्याणकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
त्या पत्रात असे म्हटले आहे की, या प्रकल्पासाठी शासनाचा मोठा निधी खर्च झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत हा नाका कार्यान्वित न झाल्यामुळे टोल नाक्यामुळे शासनाला मिळणारे उत्पन्नही बंद झाल्याने दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांमध्ये असलेले आर्थिक किंवा इतर व्यवहार तात्काळ पूर्ण करून हा प्रश्न मार्गी लावा तर हा कोणत्याही परिस्थितीत टोल नाका सुरू करणे शक्य नसेल तर त्या जागेचा उपयोग जनहितासाठी करावा. त्या ठिकाणी हॉस्पिटल, शाळा किंवा मार्केट यासारखे प्रकल्प उभारण्यात यावे आणि त्या जागेचा सदुपयोग करण्यात यावा, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे.