पाण्यासाठी जांभारीतील महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या
-rat७p२९.jpg-
P२५N८२८६०
रत्नागिरी ः जांभारी येथील ग्रामपंचायतीत महिलांबरोबर चर्चा करताना उपसरपंच मंगेश पावरी.
----
पाण्यासाठी जांभारीतील महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
दहा दिवसानंतरही प्रश्न जैसे थे; अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने जांभारीतील महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असतानाच प्रशासन ढीम्मच आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच आदेश पावरी पंचायत समितीमध्ये या टेबलावरून त्या टेबलावर पाण्याची व्यथा मांडत फिरत आहेत; मात्र जांभारी गावातील टाकीपर्यंत दाबाने पाणी का पोचत नाही यावर तोडगा काढण्यात अधिकारी, कर्मचारीही अपयशी ठरले आहेत.
तालुक्याच्या एका बाजूला खाडीकिनारी वसलेल्या जांभारी गावाला २८ जुलैपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याचे निमित्त घडले आणि त्या दिवसापासून जुन्या पाईपलाईनला अपेक्षित दाबाने पाणी येणेच बंद झाले. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत गाऱ्हाणे मांडले गेले; पण जांभारीवासियांचा प्रश्न अजूनही आहे तसाच आहे. आज संतापलेल्या महिलांनी जांभारी येथील ग्रामपंचायत कार्यालय गाठले. गटविकास अधिकाऱ्यांना भेटायला सरपंच आदेश पावरी हे पंचायत समितीत आले होते. महिला ग्रामपंचायतीवर धडकल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पावरी यांनी उपसरपंच मंगेश पावरी यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले. उपसरपंचांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजावून सांगितले. त्यावर महिलांनीही आमचा पाणीप्रश्न तातडीने सोडवा, आम्हाला आर्थिक भुर्दंड बसत आहे, असे ठणकावून सांगितले.
जांभारी गावाची लोकसंख्या साडेतीन हजार असून, गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी मोठी टाकी उभारण्यात आली आहे. सध्या पाणीच कमी दाबाने येत असल्याने ती टाकी फक्त ४ फूटच भरते. आठ फूट टाकी भरली की, अर्ध्या गावाला पाणी पुरते. त्यामुळे सध्या या गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली असली तरी ती योजना अर्धवटच आहे. त्यामुळे जांभारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
दरम्यान, जांभारी गावाला पाणी पुरवणाऱ्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली असून, लिकेज काढण्यात आले आहेत, असे पंचायत समितीच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच गटविकास अधिकाऱ्यांनीही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सरपंचांना दिले आहे. याबाबत पालकमंत्र्याच्या स्वीय साहाय्यकांनीही दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
----
कोट
जुन्या पाईपमधून पाणी व्यवस्थित येत नसेल तर सैतवडे येथून जांभारीपर्यंत नवीन टाकलेल्या पाईपमधून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी सूचना केली आहे.
- आदेश पावरी, सरपंच, जांभारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.