अडखळ उपसरपंचांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा
अडखळ उपसरपंचांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
सरपंच अपात्र प्रकरणी कार्यवाहीची प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः कोकण विभागीय आयुक्तांनी दापोली तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र ठरवले. सरपंचांच्या अपिलावर ग्रामविकास मंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती आदेश दिले. या आदेशाला ५ महिने होत आले तरी अंतिम निर्णय न झाल्यामुळे याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच रऊफ काझी यांनी ही स्थगिती उठावी यासाठी १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार, कामकाजातील अनियमितता संदर्भात अडखळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच रऊफ काझी यांनी सरपंच रवींद्र भट यांच्याविरुद्ध कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर आयुक्तांनी सरपंच घाग यांना अपात्र ठरवले. आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध सरपंचांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील केले. या अपिलावर १३ फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ मार्चला पुढील सुनावणी होईपर्यंत आयुक्तांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. याला पाच महिने होऊन गेले तरी ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीवर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे तक्रारदार असलेले उपसरपंच रऊफ काझी यांनी पुन्हा स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.