रत्नागिरी-गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र
82975
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी सुविधा केंद्र
बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ः राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आढावा बैठक
एक नजर
* तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट
* रस्त्यांची होणार दुरुस्ती
* पर्यायी रस्तेफलक
* पेवरब्लॉक यांची कामे तातडीने करण्याची सूचना
रत्नागिरी, ता. ८ : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यासाठी मार्गावर सुविधा केंद्र देण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्यांना कोणताही रस्त्यांचा त्रास होऊ नये, याबाबत खबरदारी घ्या. महामार्गावर तीन ब्लॅकस्पॉट आहेत त्याची आणि रस्त्यांची दुरुस्ती करा, पर्यायी रस्त्यांचे फलक लावा, पेवरब्लॉकची कामे व्यवस्थित झाली पाहिजेत. ही सर्व कामे तातडीने करावीत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाची काल पाहणी करून शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना खराब रस्त्यांची, वाहतूककोंडीबाबत कोणतीही अडचण येता कामा नये. रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. चिखल हटवून तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी लाईटची मागणी आहे तिथे हायमॅक्स लावून द्या. काही ठिकाणी पेवरब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे, ते व्यवस्थित बसले पाहिजेत. त्याचा वाहतुकीसाठी कोणताच त्रास होता कामा नये. घाटाच्या ठिकाणी मातीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करा. प्रवाशांसाठी सुविधाकेंद्र, रुग्णवाहिका, महिलांसाठी आवश्यक सुविधा याबरोबरच पर्यायी रस्ता याबाबतचे फलक, पोलिस सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग या सर्वांनी लावून प्रवाशांना सुविधा द्याव्यात. मंडणगड येथील न्यायालय बांधकाम इमारतीबाबतही त्यांना यावेळी आढावा घेतला. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संगणकीय सादरीकरण करत रस्त्यांबाबत उपाययोजनांविषयी माहिती दिली.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असले, तरी वाहतूक सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीमध्ये मार्गावर तीन ब्लॅकस्पॉट आहेत. हातखंबा, निवळी आणि दाभोळ येथे हे स्पॉट आहेत. या स्पॉटवर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून या स्पॉटची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच सध्याचा जो रस्ता दुरुस्त करावा जेणेकरून चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखरूप आणि सुरक्षित होईल, अशा सूचना भोसले यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.