सावंतवाडी स्थानकावर लवकरच दोन लिफ्ट
सावंतवाडी स्थानकावर
लवकरच दोन लिफ्ट
सावंतवाडी ः कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश आले असून येथील रेल्वे स्थानकावर लवकरच दोन लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग, लहान मुले आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म १ आणि ३ वर चढणे-उतरणे सोईचे होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याची माहिती सचिव मिहीर मठकर यांनी दिली. या लिफ्टसाठीचे टेंडरही मंजूर झाले आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटर लांबीची निवारा शेड उभारण्यासाठीही टेंडर निघणार आहे. बेलापूर येथे १७ मार्चला झालेल्या बैठकीत त्यांनी कोकण रेल्वेकडून लिफ्ट आणि निवारा शेड मंजूर करून घेतले होते, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली. या यशामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस बनविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
--------
जिल्हा ज्युदो स्पर्धेत
सृष्टी पटेलचे यश
शिरगाव ः शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सृष्टी पटेल हिने जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ओरोस येथील जिल्हा मुख्यालय क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत असलेल्या सृष्टी हिने १९ वर्षांखालील ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून चमकदार कामगिरी केली. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली. तिला प्रशालेचे क्रीडाशिक्षक आदिनाथ प्रसाद गर्जे, प्रवीण शेट्ये यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे आदींनी अभिनंदन केले.
....................
सह्याद्री पट्ट्यात
गव्यांची दहशत
वैभववाडी ः सह्याद्री पट्ट्यातील नावळे, सांगुळवाडी, सडुरे, शिराळे, करूळ, अरुळे यांसह इतर गावांत गव्यांनी धुमाकूळ घातला असून भात, नाचणी पिकासह काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जात आहे. सांगुळवाडी फाटकवाडी येथील शेतकरी दीपक फाटक व प्रशांत रावराणे यांच्या भातशेतीचे गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गव्यांनी लागवड केलेली भातशेती फस्त केली. वनविभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
----
पाटमध्ये मुलांनी
बनविल्या राख्या
कुडाळ ः पाट हायस्कूलमध्ये दरवर्षी विविध कलात्मक उपक्रम राबविले जातात. कार्यानुभव आणि ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगतीच्या कलात्मक राख्या बनविल्या. दीपिका सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमार्फत या राख्या बनविल्या. या कार्यशाळेस मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपस्थित होते. विद्यालयात कलाशिक्षक संदीप साळस्कर हे गणेशमूर्ती कार्यशाळा, शुभेच्छा कार्ड तयार करणे, स्टोन आर्ट, काष्ठशिल्प असे उपक्रम घेत असतात. संस्था चालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.