सदर-पर्यटन व्यवसाय बळीराजा कधी स्वीकारणार
बोल बळीराजाचे---लोगो
(२ ऑगस्ट टुडे ४)
श्रावणाच्या ऊन-पावसाच्या खेळात कोकण न्हाऊन निघतोय. थोडा लवकर आलेला मॉन्सून आता मध्यावर आलाय. भातलावणी, नाचणी, कुळीथ, उडीद, तीळ यातून आता उसंत मिळतेयं. बागायतदार आता साफसफाईचं-टाळमातीचं नियोजन करत आहेत. या क्षणभर विश्रांतीत बाप्पाच्या आगमनाची चाहूल सुखावतेय. या काळात कोकणात निवांत फिरायला येणारा पर्यटक मात्र थोडा दुर्लक्षितच राहतोय. माझ्या बळीराजानं पावसाळी पर्यटनाचं कोकणी मॉडेल विकसित करायला हवं. पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचं जाळं उभं राहतंय; पण माझ्या बळीराजाच्या पुढच्या पिढीनं रेल्वेचे डबे वाढले तरी मातीपासून न पळता, पळत्या पर्यटकाला कोकणात थांबवायला हवं.
-rat८p१५.jpg-
P25N83009
--जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड, रत्नागिरी
---
पर्यटन व्यवसाय
बळीराजा कधी स्वीकारणार?
आता पर्यटन हा श्रीमंतांचा शौक राहिलेला नाही तसेच दिवाळीच्या-मे महिन्याच्या सुट्ट्या, वर्षअखेरचा ख्रिसमसचा हंगाम हेच दिवस फिरण्याचे हे समीकरण इतिहासजमा झालंय. कोकणात पावसाळ्यात नको रे बाबा, हेही आता राहिले नाही. आता वर्षभर केव्हाही, कोणीही, कुठेही फिरताना, पर्यटन करताना दिसतो. मुक्त आर्थिक व्यवस्था, वाढता शैक्षणिक स्तर, माणसाच्या हातात आलेला पैसा आणि मुख्यतः शेवटचा दिस गोड.. नव्हे तर प्रत्येक दिस गोड व्हावा ही काळानुरूप बदललेली मनोभूमिका किंवा कष्टाबरोबरच उपभोगाला आलेलं वलय पर्यटनवाढीचा आमुलाग्र बदल दर्शवतो; मात्र या संधीचं माझा बळीराजा सोनं करताना दिसत नाही. कृषी पर्यटनात कृषी फारशी राहिली नसली तरी अजूनही निसर्गसंपन्न कोकणात पाऊस भरपूर आहे. फक्त पर्यटक स्थिरावायला थोडं नियोजन आवश्यक आहे.
सर्वसाधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस बरसतो. मृदगंधाची ती लयलूट पर्यटकांना निश्चितच आकर्षित करू शकते. शांत, निवांत माड, पोफळीच्या बागेत किंवा पालवी टाकायला आतूर झालेल्या आंब्याच्या बागेत त्या पर्जन्यगीताबरोबर मस्त गरमागरम कॉफी, गवती चहाचा घोट घ्यायला कोणाला आवडणार नाही. कोकणात सागराची गाज तर आहेच; पण गावोगावचे खळाळते पऱ्ये (वहाळ) फेसाळत वाहताना अनुभवणं एखाद्या मैफलीपेक्षा कमी नाही. गावोगावी कोसळणारे हंगामी धबधबे निश्चितच पर्यटकांना आकर्षित करतील. यासारखी अप्रसिद्ध; पण आपली वाटावी अशी ठिकाणं गर्दीतून निवांतपणा शोधणाऱ्या पर्यटनाला खूप संधी निर्माण करतील. आडवाटेवरचं पण स्वच्छ, सुंदर, प्रदूषण नसलेलं असं कोकण हे माझ्या बळीराजाचं वैभव ठरायला हवं.
या थंड, रिपरिपणाऱ्या पावसाला कोकणच्या खाद्यसंस्कृतीची जोड देता येईल. रानभाज्यांचं, खास कोकणी पदार्थांच भलंमोठं क्षेत्र आपल्या बळीराजाला खुणावतंय. पावसाळी मासळी आणि मांसाहारी पदार्थांबरोबरच अगदी भाजणीचे गरमागरम वडे, कुळथाची उसळ, गरमागरम कळ्हण....किती पदार्थांची वर्णनं करावी? मैद्याच्या, फ्रीजमधल्या, बेकरीतल्या आणि पोटाची वाट लावणाऱ्या पदार्थांनी वैतागलेला पर्यटक नक्कीच कोकणच्या खाद्यसंस्कृतीवर फिदा होईल.
नांगर धरण्यापासून, दाढ काढणी, लावणी, चिखल तयारी, बांधघालणी, जोत-मशिन धरणं यात आलेल्या हौशी मंडळींना सामील करून घ्यायला हवं. कोंडीत उड्या मारून, फेसाळत वाहणाऱ्या पऱ्यात आंघोळीनंतर शेकोटीची मजा थाळीसमोर द्यायला हवी. त्याच थाळीत भाजलेल्या खमंग-गरम काजू बिया, आठळा त्याच्या मनात कोकणविषयी नक्कीच ऊब निर्माण करतील.
श्रावण-भाद्रपदातले उत्सव ही कोकणातील पर्यटनासाठी पर्वणी आहे. माझ्या बळीराजानं वर्षानुवर्षे चाकरमान्यांचे स्वागत या काळात आपल्या घरातल्या माणसांच प्रेम म्हणून केलंच आहे. आता त्याला थोडी सफाईदार पर्यटन उद्योगाची जोड द्यायला हवी. श्रावणातल्या एक्क्यात, गणपतीच्या आरती-भजनात, बाल्याच्या फेर धरून नाचण्यात आलेले पाहुणे रंगून जायला हवेत. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्यांना लोकलचा आवाज त्यागून टाळ-ढोलकीच्या आवाजात स्वतःला विसरायला लावायची ताकद नक्कीच आहे.
गांधीबाबांनी कधीकाळी ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला. पुस्तकी शहाणपणानं मातीत पाय रोवून असलेल्या बळीराजाची पुढची पिढी आता डोक्यात झगमगाटाची माती घेऊन शहरात धावते आहे. पशुपालन, शेती, बागायती, शेतीपूरक, पर्यटन, लघुप्रक्रिया उद्योग, नर्सरी, औषधी वनस्पती अशा हजारो शाखांत कोकणातील माझ्या शेतकऱ्यांचे कुर्याठी-मळे-बावळीतलं शेत विस्तारलंय आणि आम्ही मृगजळात २४×७ धावतोय. कोकणच्या पावसाळी कृषी पर्यटनात अतोनात संधी खुणावतायंत. चिखलातल्या या विचारानं जिद्दीचं पाळ घ्यायला हवं. थोडं शासन प्रशासनाचं नत्र पडलं की, गडद हिरवी काळोखी आलीच म्हणून समजा. स्वाती नक्षत्रात पडलेल्या प्रत्येक थेंबाचा मोती होणार नसला तरी शिंपल्यांनी तोंड तरी उघडायला हवं. आपली नैसर्गिक गुणवत्ता, सचोटी, प्रामाणिक कष्टाची तयारी कुठे तरी कोकणात समृद्धीच्या कामी यायला हवी नाहीतर मोदकावर कोकण कपिलाच्या दुधाचं साजूक तूप काय कामाचं!
(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.