चिपळूण-परशुराम घाटाची पाहणी न करताच उपाययोजनांचा प्रस्ताव
82973
परशुराम घाट न पाहताच उपाययोजनांचा प्रस्ताव
शिवेंद्रसिंहराजेंचा अंधारात पाहणी दौरा; चिपळुणात कार्यकर्त्यांशी चर्चा
चिपळूण, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नव्याने उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली; मात्र या दौऱ्यात त्यांनी परशुराम घाटाची प्रत्यक्ष पाहणी न करताच थेट चिपळुणात जाणे पसंत केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरूवारी (ता. ७) शिवेंद्रसिंहराजेंनी चिपळूण तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट दिली. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांचे परशुराम घाटाजवळ आगमन झाले. महायुतीच्यावतीने आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंद्रथ खताते, भाजपचे नेते रामदास राणे, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी आदी उपस्थित होते.
चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एका विद्यार्थ्यावर सळी कोसळल्याने झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निहार कोवळे यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे केली. महामार्गावरील अडचणींबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर निवेदने दिली. यानंतर मंत्री भोसले परशुराम घाटाची प्रत्यक्ष पाहणी न करता ‘घाटाला वळसा’ घालून थेट चिपळूण शहरात पाग पॉवरहाऊस येथे पोहोचले. येथे झालेल्या चर्चेत माजी आमदार विनय नातू, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. उमेश सकपाळ यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांची माहिती देताना संदेश भालेकर यांचा अलीकडील अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. विजेची अनुपलब्धता, पावसात पाणी साचणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे शशिकांत मोदी यांनी निदर्शनास आणले.
चौकट
महामार्ग वर्षभरात पूर्ण
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होईल आणि शंभर टक्के प्रगती होईल, अशी नवी डेडलाईनही त्यांनी जाहीर केली; मात्र परशुराम घाटाची पाहणी न केल्यामुळे स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.