तुंबाड-अंजनी नदीवर पूल व्हावा

तुंबाड-अंजनी नदीवर पूल व्हावा

Published on

तुंबाड-अंजनी नदीवर पूल उभारा
संदीप फडकले ; दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : तालुक्यातील तुंबाड ते अंजनी नदीवर पूल नसल्याने येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने येथील तरुण रोजगारासाठी मुंबई-पुणेसारख्या शहरात स्थलांतरित होत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तुंबाड-अंजनी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी मनसेचे खेडचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी केली आहे.
या पुलाचा खाडीपट्ट्यातील तुंबाड, सवणस, बहिरवली नं.१, बहिरवली चौगुले मोहल्ला, होडखाड, पन्हाळजे, सवणस खुर्द, सवणस, मुळगाव, आमशेत, कर्जी, राजवेल, शिर्शी, मुंबके, अनसपुरे, तळघर, भडवळे, फरारे, उन्हवरे, तामोंड दमामे, कात्रण, पोफळवणे (ता. दापोली) आदी गावातील ग्रामस्थांना उपयोग होईल तसेच अंजनी रेल्वेस्थानकात दिवा पॅसेंजरला थांबा मिळाल्याने अंजनी स्थानकांत प्रवासीसंख्येत वाढ होईल. याचबरोबर दळणवळण व पर्यटनाला चालना मिळण्याच्यादृष्टीने तुंबाड-शिबलीवाडी ते अंजनी रेल्वेस्टेशनला जोडणारा पूल होणे काळाची गरज आहे. हा पूल झाल्यास दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा जोडरस्ता तयार होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com