सावंतवाडीत ‘बांधकाम’च्या कारभाराविरोधात ‘ढोल बजाओ’

सावंतवाडीत ‘बांधकाम’च्या कारभाराविरोधात ‘ढोल बजाओ’

Published on

83056

‘बांधकाम’च्या कारभाराविरोधात ‘ढोल बजाओ’

सावंतवाडीत ठाकरे गटाचे आंदोलन; रस्ते दुरुस्ती, कारागृहप्रश्नी डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आज ठाकरे शिवसेनेतर्फे कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ‘ढोल बजावो’ आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाढलेली झाडी दहा दिवसांत हटवून रस्ते वाहतुकीस सुरळीत करावे. मजबुतीकरणाच्या नावाखाली शहरातील ऐतिहासिक जिल्हा कारागृहाच्या वाताहतीस जबाबदार असलेल्या शाखा अभियंत्यावर २५ ऑगस्टपूर्वी कारवाई व्हावी. अन्यथा २६ ऑगस्टला एकवीस ढोलांसह कार्यालयासमोर गाढव उभा करून त्याला सलामी ठोकण्याचे आंदोलन करू, असा इशारा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.
ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी अलीकडेच दिला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन छेडले. आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही कार्यकारी अभियंता पूजा इंगवले या दोडामार्ग दौऱ्यावर गेल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त करत जोरजोरात घोषणाबाजी केली. जोपर्यंत कार्यकारी अभियंता या ठिकाणी उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. अखेर दुपारी उशिरा कार्यकारी अभियंता पूजा इंगवले आल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी सर्वांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. कोकणातील गणेशोत्सव हा सर्वांत मोठा उत्सव असताना केवळ पाहणी दौरे करत आहात. यामुळे रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि वाढलेली झाडी याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची बैठक बोलावून ज्या भागातील रस्ते खराब झाले आहेत, तेथे दहा दिवसांत डागडुजी करून रस्ते वाहतुकीत सुरळीत करण्यात यावेत. बांधकाम विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून जे रस्ते यावर्षी नव्याने करण्यात आले, त्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. केवळ ठेकेदार आणि अधिकारी वर्गांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ करत आहेत. मात्र, ठाकरे शिवसेना हे सहन करणार नाही, असा इशारा रुपेश राऊळ व मायकल डिसोजा यांनी दिला. यावर दहा दिवसांत विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करू, अशी ग्वाही कार्यकारी अभियंत्यांनी दिली. शहरातील ऐतिहासिक वस्तू असलेल्या जिल्हा कारागृहाची मजबुती करण्याच्या नावाखाली काम केले. मुळात जुन्या बांधकामाचे कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता त्यावर नव्याने चिऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे कारागृहाची भिंत कोसळली. ज्या शाखा अभियंत्याने हे काम केले, त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, केवळ चौकशीच्या नावाखाली दिशाभूल करण्याचे काम प्रशासनाने केले. मात्र, यापुढे ते सहन करणार नाही. २५ ऑगस्टपर्यंत संबंधितावर योग्य कारवाई करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. अन्यथा २६ ला २१ ढोलांसह गाढवाला सलामी देण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विधानसभा प्रमुख राऊळ यांनी दिला. या संदर्भात चौकशी अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंता इंगवले यांनी दिली. ज्या संस्थेने हे काम केले, त्या संस्थेचे बिल यापुढे अदा करू नये, अशी मागणी केली. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहर संघटक निशांत तोरस्कर, शब्बीर मणियार, सुनील गावडे, अजित सांगेलकर, बाळू गवस, सतीश नार्वेकर, पंढरी राऊळ, शहर संघटक महिला श्रुतिका दळवी, गुरू नाईक, संतोष राऊळ, सोनू कासार, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
----
खोदलेला रस्ता तसाच
एसटी महामंडळाने शहरातील मियासाब समाधीपर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी खोदलेला रस्ता अद्यापही तसाच आहे. या संदर्भात पूर्णपणे निधी बांधकामकडे देऊनही त्यावर कोणतेही काम केले नाही, याकडे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी लक्ष वेधले. उपअभियंता कार्यालयासमोरील रस्त्यावर ठेकेदारांकडून दोन्ही बाजूने गाड्या लावल्या जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातासारखे प्रकार घडत आहे. त्यावर तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com