रत्नागिरी : पखवाज वादनात देशात प्रथम
-rat9p25.jpg
प्रथमेश तारळकर
पखवाज वादनात देशात
आडिवरेचा प्रथमेश प्रथम
संगीत अलंकार परीक्षा; १८ ला मुंबईत गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : आडिवरे (ता. राजापूर) गावचा सुपुत्र, पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशात सर्वप्रथम येण्याचा पराक्रम केला आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात येत्या १८ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता त्याला संगीत अलंकार पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याला पंडित गणेश आण्णा चौधरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे.
अलीकडेच रत्नागिरीच्या अथर्व आठल्ये याने गांधर्व महाविद्यालयाच्या तबला वादन अलंकार परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला होता. आता प्रथमेशनेही रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. प्रथमेशने पखवाजवादनाने राज्यभरात नावलौकिक मिळवला आहेच. आता त्याने देशपातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या वादनात उत्तम प्रगती करत प्रथमेशने राज्यभरातील विविध नामांकित संगीत महोत्सवांत पखवाजवादन केले आहे.
प्रथमेश वयाच्या आठव्या वर्षांपासून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे. वडील संजय तारळकर भजनीबुवा असल्याने त्याला घरातूनच सांगीतिक संस्कार मिळाले. प्रथमेशने गुरू परशुराम गुरव आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे गिरवले. गायकांना पखवाज साथसंगत करण्याबरोबर प्रथमेश आता एकल पखवाज वादनही करतो. तो सध्या मुंबईत पखवाज वादनाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे. मला गुरुजींनी ज्या तळमळीने शिकवले त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवतोय, असे प्रथमेशने सांगितले.
प्रथमेशशी संपर्क साधला असता तो म्हणाला, मी पखवाज वादन १५ वर्षे शिकत आहे. यात आई-बाबांचा मोठा वाटा आहे. नोकरीत न अडकता काही वर्षे शिक, असा विश्वास गुरूंनी दिला; तसेच रत्नागिरीचे पखवाजवादक राजा केळकर, उत्तम करंबेळकर, वसंत गोखले, उमाशंकर दात्ये, विनय दाते, अवधूत बाम, हेमंत मेस्त्री, सुशील मेस्त्री व अनेकजण आणि रत्नागिरीत सर्व कलाकार मंडळींचे प्रेम, मार्गदर्शन मिळाले.
----------
कोट १
आपण हे यश गुरूंबरोबरच आई-वडील आणि कायम पाठीशी असलेला मित्रपरिवार, शुभचिंतक यांच्या कृपाशीर्वादाने मिळवले आहे. हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी हे प्रोत्साहन आहे. यापुढेही संगीतसाधना, संगीतसेवा अशीच सुरू ठेवणार आहे. संगीत विषय अगणित आहे. त्यामुळे अजून बरेच काही शिकायचे आहे.
- प्रथमेश तारळकर
--------
चौकट १
यांना केली पखवाजसाथ
प्रथमेशने नामवंत गायक संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकीताई पंडित, मंजुषा पाटील यांना पखवाजसाथ केली आहे. यंदा शास्त्रीय संगीत विश्वातील जगविख्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही वादन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.