वसा वसुंधरा रक्षणाचा
वसा वसुंधरा रक्षणाचा...
(४ ऑगस्ट टुडे ३)
भारतीय संस्कृती ही परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी आहे. कालानुरूप या परंपरांच्या जपणुकीमध्ये फरक पडत गेला आणि नकळत त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचू लागला. वातावरण बदलामुळे सध्याची परिस्थिती गंभीर होत आहे. तिला सावरण्याकरता पर्यावरण पूरक समारंभाचा अंगीकार करणे काळाची गरज आहे.
- rat१०p१.jpg-
P25N83358
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
---
(भाग - एक)
पर्यावरण पूरक उत्सव काळाची गरज
सर्व धर्मीयांच्या क्षण समारंभामध्ये अतिशय आनंद उत्सवाचे वातावरण असते आणि या आनंदोत्सवाच्या नादात नकळतपणे आपण पर्यावरणाला कशी हानी पोहोचवतो हे लक्षातच येत नाही. त्या करता आपल्याला पर्यावरण पूरक समारंभ, उत्सव, सण, कार्यक्रम, सभा, संमेलन नक्की कशा पद्धतीने अंगीकार करायचा हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही सण समारंभ म्हटला की त्यामध्ये रोषणाई आली, सजावट आली, मेजवानी, पार्टी, अंगत पंगत हे सर्व काही आले. कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात हे सर्व भाग हे येतातच. ध्वनी, वायू, जल व जमीन प्रदूषण या चारही मूलाधारांवर नकळत विपरीत परिणाम प्रत्येक छोट्या-मोठ्या सण समारंभात होताना दिसतो.
अगदी छोटासा पंधरा ते वीस गटाची सभा, संमेलन, पार्टी असो किंवा शेकडो हजारो नागरिकांचा महोत्सव असो. पुढील गोष्टी या ठिकाणी आवर्जून दिसतात. सर्व बंदी असलेल्या ‘यूज अँड थ्रो’ च्या वस्तू अर्थात एकल वापरातील वस्तू सिल्वर कोटींग पेपर डिश, चहा ग्लास, प्लास्टिकच्या स्ट्रॉ, पाणी पिण्यासाठी ग्लास, पाणी देण्यासाठी छोट्या पाणी बॉटल्स, टिश्यू पेपर या वस्तू कोणत्याही छोट्या मोठ्या समारंभामध्ये सद्यःस्थितीत प्रचंड प्रमाणात वापरल्या जातात. या प्राधान्याने वापरण्यात येणाऱ्या वस्तू झाल्या. त्यानंतर कार्यक्रमाकरिता फ्लेक्स बोर्डचा वापर केला जातो, प्लास्टिकच्या फुला पानांच्या माळांचा वापर केला जातो, फुग्यांचा वापर केला जातो, अगदी प्रसादाचे छोटे द्रोण ते देखील कागदाच्या सिल्वर कोटिंग मधील वेस्टन असलेले वापरले जातात. फुलांचे बुके आणताना ती फुले प्लास्टिक मध्ये रॅप करून आणली जातात. अशा छोट्या गोष्टी या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये केल्या जातातच. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा आवारात कुठेतरी टाकल्या जातात आणि जाळण्याचा प्रयत्न केला जातो. आग लावल्यानंतरही या वस्तू सर्व जळून जात नाहीतच आणि जळत असताना त्या प्रदूषण करतात. अतिशय विषारी असा वायू हवेत सोडत असतात. काही वेळा काही कार्यक्रमानंतर तेथील वस्तू विसर्जित करण्याच्या निमित्ताने किंवा कोठेतरी टाकायचं म्हणून नाल्यात फेकून दिल्या जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणीही देखील पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण होते. कार्यक्रम संपल्यानंतर ची ही परिस्थिती आपण जाणिवेने प्रत्येकाने आठवल्यास अशीच असते हे लक्षात येईल.
सध्या कार्यक्रम पर्यावरण पूरक नसल्यामुळे प्रदूषणात वाढ होते आहे. आनंद हा प्रत्येकाने साजरा करावा. समारंभ प्रत्येकाने साजरा करावा आणि प्रत्येकाचा आपण आदरच करतो. आता गरज आहे ती पर्यावरण पूरक समारंभांची. पण पर्यावरण पूरक समारंभ करायचे म्हणजे नक्की काय करायचे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. प्रथमतः अतिशय सोपा उपाय म्हणजे आपल्या आजपर्यंतच्या लागलेल्या हाताची सवय. स्थिर जीवनशैली आणि शाश्वत पर्यावरण विकासाकरिता मानसिक स्वास्थ्या करता आपल्या प्रत्येक कार्यक्रमात अर्थसंकल्प मांडताना थोडा वाढीव पद्धतीचा करावा. कारण तसे केल्यामुळे आपल्याला आत्मिक आणि नैसर्गिक आनंद अधिक मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण घर शोधताना, फिरायला जाताना, हॉटेल शोधताना चांगलं आणि शुद्ध आणि सुरक्षित या तीन गोष्टींच्या आधारावर शोध घेतो. ते करताना प्रसंगी दोन पैसे जास्त खर्च झाले तरी हरकत नाही पण आपल्याला उत्तम गोष्ट मिळाली पाहिजे अशी आपण स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक क्षण समारंभामध्ये आपल्याला आपल्या अर्थसंकल्पामध्ये किंचित वाढ करावी लागणार आहे. कारण नेहमीच स्वस्त आणि शॉर्टकट पद्धतीने केलेलं काम हे अधिक टिकाऊ नसतं किंवा शॉर्टकट अनेक वेळा घातक ठरत असतो. यूज अँड थ्रो च्या वस्तूंनी हेच सिद्ध केलं आहे.
उदाहरणार्थ स्टीलच्या डिश आणि पेपर डिश यामध्ये अर्थातच भाड्याने स्टीलच्या डिश आणल्या तर शेकडा शंभर रुपये जातात आणि कागदी पेपर डिश आणल्या तरी शंभरच रुपये पडतात. पण स्टील डिश धुण्यासाठी कष्ट किंवा कमवालीला अधिक पैसे डिश धुण्यासाठी द्यावे लागतात. मात्र ज्या चकचकीत दिसणाऱ्या कागदी डिश आपण मोठ्या ऐटीत दुकानातून खरेदी करतो आणि आलेल्या पाहुण्यांना गरमागरम वडा किंवा उपमा हा त्या डिशमध्ये घालून जेव्हा देतो, सोबत एक प्लास्टिकचा चमचाही देतो. त्यावेळी ती गरम वस्तू किंवा तो पदार्थ, त्या कागदी डिशवरच्या सिल्वर कोटिंगवर असलेल्या प्लॅस्टिकला वितळवू लागतो आणि आलेल्या पाहुण्याला आपण प्लास्टिक मिश्रित पदार्थ नकळत खाऊ घालतो. अनेकदा तो प्लास्टिकचा चमचा हा मोडतो किंवा उपयोगात येत नाही. पाहुणचार झाल्यानंतर ती डिश आणि तो चमचा डस्टबिनमध्ये जातात. कोणी कागदाचे समजून झाडाच्या बुंध्यात विघटनासाठी टाकून देतात. मात्र त्यावर असलेला सिल्वर कोट आणि प्लास्टिक हे अविघटनशील असल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जमिनीचे प्रदूषण होते आणि झाडाला इजा ही पोहचते.
प्लास्टिकच्या पाण्याचा ग्लास किंवा पाण्याच्या बाटली मधून जे आपण पाणी देतो, त्यामधून आपल्या शरीरात सूक्ष्मपणे प्लास्टिकचा अंश जात असतो. संशोधनानुसार मानवी रक्तातील प्लास्टीकच्या अंशामधील अकरा टक्के इतके जास्त प्रमाण हे पाण्याच्या प्लास्टिक बाटलीमुळे गेलेले आढळून आले आहे. फॅशन म्हणून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांच्या वितरणाचा चुकीचा अंगीकार आपण केला आहे. प्रत्येकाला छोटी पाण्याची बाटली दिली जाते ही पाण्याची बाटली थोडंसं पाणी पिऊन आणि भरपूर शिल्लक ठेवून आपल्याच खुर्ची खाली किंवा कुठेही सभागृहामध्ये ठेवली जाते. त्यामुळे सदर सभागृहाच्याही सौंदर्याला धोका पोहोचतो. गलिच्छता दिसू लागते आणि एका बाजूने पाणी संचयासाठी प्रयत्न करणारे आपणच गरज नसताना घोटभर पिऊन उरलेले पाणी त्या बाटलीत तसेच फेकून देत असतो. त्यामुळे प्लास्टिक मुळे जमिनीचे प्रदूषण होते आणि पाणी वाया घालवल्यामुळे जलसाठा कमी करण्यास आपण हातभार लावतो. काही ठिकाणच्या पाण्याच्या बाटल्या पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी त्या कचऱ्यात जाळल्याचे दिसून येते. स्वच्छता म्हणजे आग लावणे हा एक गैरसमज आहे आणि यामुळे वायू प्रदूषण आणि जमिनीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात सातत्याने सर्वत्र होत असते. हे सर्व टाळता येणे शक्य आहे. पण या करिता आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
(लेखक - शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील मानक डॉक्टरेट पदवी प्राप्त आहेत)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.