गॅस टँकर अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- rat१०p२.jpg-
P२५N८३३५९
निवळी-जयगड मार्गावर बंद पडलेला ट्रक.
- rat१०p३.jpg-
२५N८३३६०
महामार्गावर उलटलेला गॅस टँकर.
गॅस टँकर अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कडक नियोजनाची गरज ; गणेशोत्सवात वाढणार वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १० ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि निवळी-जयगड राज्यमार्गावर एलपीजी गॅस टँकर अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे महामार्गावर सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी महामार्गांसह राज्यमार्गांवरही वाहतूक वाढणार आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
मागील महिन्याभरात गॅस टँकर उलटणे, गळती होणे यासह रस्त्याच्या बाजूला टँकर कलंडणे, विविध कारणांमुळे टँकर रस्त्यात बंद पडणे अशा विविध घटना सतत घडून लागल्यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अशा घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळेवर हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला. रस्त्यांची दुरवस्था, चालकांची बेफिकिरी आणि वाहतूक यंत्रणेचे अपयश ही या अपघातामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. या घटनांनंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देशही दिले आहेत. मात्र, टँकर कंपन्यांची तपासणी, वाहनांची नियमित देखभाल व चालकांना सुरक्षा प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. पावसाळ्यात रस्ते अधिक धोकादायक बनत असून, लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवळी घाट आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड टँकर उलटणे, गॅस गळती अशा स्वरूपाच्या चार घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गॅस गळतीमुळे परिसरात दहशत आणि वाहतूक विस्कळीत झाली. काही वेळेस महामार्ग तासन्तास बंद ठेवावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासन, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित टँकर कंपन्यांनी एकत्र येऊन या समस्येवर तातडीने ठोस उपाय करणे अत्यावश्यक आहे. एलपीजी टँकर अपघात ही केवळ वाहतूक समस्या नसून, ही जनजीवन, पर्यावरण आणि जिल्ह्याच्या सुरक्षिततेशी निगडीत गंभीर बाब आहे. यावर वेळेवर लक्ष दिले नाही, तर उद्याचे संकट अपरिहार्य ठरू शकते.
चौकट
वाहतुकीत अडथळा...
निवळी-जयगड मार्गावर अवजड वाहने सतत वळणातच बंद पडत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाने कायमच दुर्लक्ष केले आहे. निवळी-जयगड मार्गावर अवजड वाहतूक सतत सुरू असते. अवजड वाहने वळणावरच बंद पडतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. स्थानिक परिसरातील नियमित वाहतूक करणारी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन चालक सतत त्रस्त झाले आहेत. अवजड वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढत असून त्यात बल्करसह गँस वाहतुकीची भर पडली आहे.
चौकट १
अपघातांची कारणे ः
* चालकांचा हरगर्जीपणा ः वेगावर नियंत्रण नसणे, वळणांवर वाहन न थांबवणे
* रस्त्यांची दुरवस्था ः महामार्गाचे चौपदरीकरण अपूर्ण, अरुंद वळणं, खड्डे, खराब गुणवत्ता.
* वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष ः वेगमर्यादा न पाळणे, रात्री अवजड वाहतुकीवर बंदी असूनही ती सुरूच.
* प्रशासनाची भूमिका ः पोलिस आणि ‘आरटीओ’ने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.
* टँकरची तपासणी ः टँकरच्या देखभाल व तांत्रिक तपासणी नियमित करणे बंधनकारक करावे.
* चालकांसाठी प्रशिक्षण ः विशेषतः एलपीजी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी नियमित सेफ्टी ट्रेनिंग.
* जनजागृती मोहीम ः ग्रामपंचायती आणि समाजसेवी संस्थांनी अपघातांविषयी जागरूकता करावी.
चौकट २
अपघातांचे परिणाम
* सुरक्षिततेला धोका ः एलपीजी गळतीमुळे स्फोटाचा धोका कायम.
* वाहतूक विस्कळीत ः अपघातानंतर अनेक तास बंद होते वाहतूक
* पर्यावरणाला धोका ः गॅस आणि इंधन गळतीमुळे परिसर प्रदूषित.
चौकट
हातखंबा येथे बचाव पथक
महामार्गावरील अपघातांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने बैठक घेऊन सूचनाही दिल्या आहेत. त्यात ताशी २० किमीपेक्षा कमी वेगाने टँकर चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हातखंबा येथे बचाव पथक कायम सज्ज ठेवण्याचे आदेश काढेल आहेत.
25N83382
कोट
जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचे काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. तिथे चालकांनी रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीचा अंदाज घेऊन, वळणं, घाट, तीव्र उतार या ठिकाणी वेग नियंत्रित करून वाहन चालवणे आवश्यक आहे. तसेच गॅस वाहतूकदार कंपनीने टँकरवरील चालक हे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त, ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे ठेवावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या चालकांविरुद्ध महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
- राणी पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र, हातखंबा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.