कासार्डे शाळेत काव्यपुष्पांची उधळण
83391
कासार्डे शाळेत काव्यपुष्पांची उधळण
‘श्रावण सरी’ मैफिलीस प्रतिसादः विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ : श्रावण मासाच्या सरींसारख्या आनंद देणारी, रसिकांच्या मनात श्रावणातील गारवा पसरणारी ‘श्रावण सरी’ काव्य मैफल कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथील शाळेच्या सभागृहात जल्लोषात पार पडली.
पावसच्या सरींच्या साक्षीने साजरी झालेली ही काव्यपुष्पांची उधळण श्रावणाच्या हिरवाईत रंगत गेली. विद्यालयातील अनेक बालकवींच्या सादरीकरणाने रसिकांच्या मनात शब्दांचे इंद्रधनू पसरले. शब्दांनी जणू जलधारांशी स्पर्धा करत अंतःकरण भिजवले. बालकवींच्या नवनवीन कल्पनांनी श्रावण सरींना विविध रंगांची उधळण करीत उपस्थितांची वाहवा मिळविली.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ‘श्रावण सरी’ या विद्यार्थ्यांच्या काव्य मैफलीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. श्रावणी पावसावर आधारित या विशेष कार्यक्रमात २३ विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करत रसिकांची मने जिंकली.
काव्य मैफिलीचा प्रारंभ दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास नवलेखक व कवी कसे घडू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक शामसुंदर राणे यांनी बालपणी अनुभवलेला श्रावणतला पाऊस कवीमनाला कशी भूरळ घालतो, याविषयी सांगितले.
''हसरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला'' अशा सुंदर श्रावण महिन्याचे वर्णन करताना विद्यार्थ्यांनी श्रावणातील सृष्टी सौंदर्य, निसर्गातील बदल, आठवणी व भावना यांचा सुरेख संगम कवितांमधून मांडला. विविध छंदांमध्ये गुंफलेल्या कविता आणि बाल कल्पनेतून पावसाला घातलेली साद अशा या उत्कृष्ट सादरीकरणामुळे वातावरणाला साहित्यिक साज चढला गेला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख संजीवनी नागावकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले. आभार वैष्णवी डंबे यांनी मानले. या काव्य मैफलीत अवधूत घुले, पांडुरंग काळे आदींनी विचार मांडले. जस्मिन जाधव, मानवी यादव, उर्वी पाटील, आकांक्षा आडिवरेकर, हर्षदा येंडे, तनिषा पालव, केतकी प्रभुदेसाई, साक्षी सावंत, पूजा आयरे, आदिती गुरव, मृदुला राणे, रिद्धी परब, हर्षराज पाताडे, प्रज्वल पाताडे, रोहन पवार, राधिका शिंदे, ऋतुजा कोकरे, दिव्या सावंत, दिव्या म्हस्के, स्वरा पाटील, साक्षी लाड, मधुरा तेली, मृदुला पाताडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.