रांगोळी चैतन्य, उत्साह, समृध्दीचे प्रतीक
83498
रांगोळी चैतन्य, उत्साह, समृध्दीचे प्रतीक
प्रा. संजीवनी पाटीलः वैभववाडीत ‘दत्तकृपा’च्या वतीने रांगोळी प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १०ः रांगोळीतून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मकता दूर होते. रांगोळी हा निसर्गाशी एकरूप असा कलाप्रकार आहे. त्यामुळे रांगोळी चैतन्य, उत्साह आणि समृध्दीचे प्रतीक असल्याचे मत प्रा. संजीवनी पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रा. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षिका प्रियाली कोदे, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, बांधकाम सभापती रणजित तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, उपाध्यक्ष राकेश कुडतरकर, प्रकाश काळे, संतोष माईणकर, संकेत माईणकर आदी उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाल्या, ‘‘प्राचीन काळापासून रांगोळी घातली जाते. तिचे स्वरूप कालानुरूप बदलले आहे; परंतु रांगोळीची संस्कृती, परंपरा कायम टिकून आहे. देवदेवतांची चित्रे, फुले, पाने अशा शेकडो प्रकारच्या रांगोळ्या घातल्या जातात. निसर्गाशी एकरुपता हा रांगोळीचा गुणधर्म कायम राहिला आहे. हिंदूंच्या प्रत्येक सणामध्ये रांगोळी घातली जाते. रांगोळी शुभ मानली जाते. सणांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचे काम रांगोळी करते. रांगोळीमुळे उत्सवामध्ये चैतन्य, उत्साह, आनंद निर्माण होतो. ''एआय''च्या जगात देखील रांगोळीचे महत्त्व अधोरेखित आहे."
प्रशिक्षिका कोदे यांनी, केवळ छंद जोपासणे एवढ्यापुरतेच कलेचे शिक्षण घेऊ नका. प्रत्येक कलेत अर्थार्जनाची क्षमता असते. चांगली रांगोळी घालणाऱ्यांना खूप मोठी संधी असते. महिलांनी रांगोळी, मेंदी यांसारख्या विविध कलांचे शिक्षण घेतले पाहिजे, असे सांगितले.
या शिबिरात ४२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. प्रतिष्ठानकडून सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला पणनचे संचालक प्रमोद रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक सुभाष रावराणे आदींनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अवधुत माईणकर, संकेत माईणकर, अमेय पोरे, नीतेश पाटील, ओंकार माईणकर, आकाश कानडे, सिध्दी माईणकर, तनया माईणकर, सान्वी माईणकर, ओवी माईणकर, भूमी कुडतरकर आदींनी प्रयत्न केले.
चौकट
कलेत कुणाची मक्तेदारी नाही
केवळ महिलाच चांगल्या रांगोळी घालतात असे नाही, तर पुरुष देखील चांगल्या प्रकारची रांगोळी घालतात. कलाकुसरता कुणाचीही मक्तेदारी नाही. प्रसंगानुसार रांगोळी घातली जाते. वारीच्या वाटेवर, मंदिर, उत्सवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या घातल्या जातात. यात पुरुषांचे योगदानही उल्लेखनीय असते, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.