देवळे गावी साकारतेय धनेशाची देवराई

देवळे गावी साकारतेय धनेशाची देवराई

Published on

83631

देवळे गावी साकारतेय धनेशाची देवराई
धनेश मित्र निसर्ग मंडळ, सह्याद्री संकल्प सोसायटीचा दुर्मीळ वृक्ष लागवड अन् अधिवास पुनर्निर्मिती उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ : रत्नागिरी जिल्ह्यातील महाधनेश पक्ष्यांच्या अधिवासात आणि खाद्यवृक्षांच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीने धनेश पक्ष्यांच्या अधिवास पुनर्निर्मितीचे कार्य गेली काही वर्षे जिल्ह्यात सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवळे गावातील देवराईमध्ये आढळ कमी होत चाललेल्या दुर्मीळ झाडांची लागवड करण्यात आली. गावातील श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात झाडे लावण्यात आली.
देवरूखची सह्याद्री संकल्प सोसायटी, देवळे ग्रामसमृद्धी अभियान, श्री देवी कालिश्री रवळनाथ मंदिर समिती, वनविभाग, आयडीबीआय बँक यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रसंगी आयडीबीआयचे बँक व्यवस्थापक प्रतीक मनवानी, चंद्रप्रकाश सैनी व अक्षांश टेंभुर्णे, वनविभागाचे अधिकारी सहयोग कराडे व सूरज तेली उपस्थित होते. सह्याद्रीचे संचालक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
देवळे गावातील ग्रामसमृद्धीचे प्रवर्तक नीलेश कोळवणकर, दीपक गुरव, यशवंत घागरे, चंद्रकांत साळवी, दिलीप शिर्के, भरत चव्हाण, विलास शिंदे, गजानन मोघे व चिपळूणचे कृषी अधिकारी व ग्रामस्थ जयेश काळोखे उपस्थित होते. प्रामुख्याने महेंद्र चव्हाण व भरत चव्हाण या धनेशमित्रांच्या सहकार्यातून हा प्रकल्प देवळे गावात साकारतो आहे. देवळे येथे सह्याद्रीचा उपक्रम २०१८ पासून सहा ते सात वर्ष सुरू आहे. देवराईमधील जैवविविधता संरक्षण व संवर्धन या ध्येयाने ही संस्था महाराष्ट्रात काम करत आहे. वेगाने नामशेष होणाऱ्या आणि जैवसाखळीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या वृक्षांची लागवड करणे आणि धोकाग्रस्त पक्षी, प्राणी यांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

चौकट
अधिवास पुनर्निमिती कार्यक्रमात सहभागी व्हा
प्रतीक मोरे हे जागतिक हॉर्नबिल संवर्धन संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. सड्यावरील दुर्मिळ फुलांचे संरक्षण व संवर्धन, रानभाज्यांचे संवर्धन आदी अनेक उपक्रम संस्था जोपासत आहेत. या अधिवास पुनर्निर्मिती कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी sahaydrisankalpsociety@gmail.com या ठिकाणी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

चौकट
शाश्वत बीज बँक बनवण्याचा निर्धार
यावर्षी दुर्मीळ होत चाललेल्या रानबिब्बा, चांदफळ, काळा धूप, गोयदडा, सुरंगी, बकुळ अशा तीन हजार वृक्षांची लागवड धनेशमित्र निसर्ग मंडळाने केली आहे. या वृक्षांची केवळ लागवड करून न थांबता त्यातून अशा वृक्षांची शाश्वत बीज बँक तयार व्हावी आणि जंगलाचे शेतकरी असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या माध्यमातून या वृक्षांचा प्रसार व्हावा अशी संकल्पना या प्रकल्पामागे आहे, असे संस्थेचे संचालक प्रतीक मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com