चिपळूण -देवराया टिकल्या तरच निसर्गाचं हृदय धडकेल

चिपळूण -देवराया टिकल्या तरच निसर्गाचं हृदय धडकेल

Published on

देवराया टिकल्या तरच
निसर्गाचं हृदय धडकेल
डॉ. अर्चना गोडबोले श्रीकृष्ण व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : देवराया म्हणजे केवळ पवित्र जंगल नव्हे तर निसर्गाशी आपले असलेले भावनिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय नाते जपणारी परंपरा आहे. त्या नष्ट झाल्या तर निसर्गाचं नुकसान होईलच; पण आपलंच जीवन कठीण होईल. त्यामुळे देवराया वाचवण्यासाठी संस्थात्मक आणि जनसहभागातून प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्त्या व लेखिका डॉ. अर्चना गोडबोले यांनी केले.
श्री लक्ष्मी-नारायण मंदिरात सुरू असलेल्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. कोकणातील देवराया आणि सद्यःस्थिती या विषयावर त्यांनी सुमारे दीड तास माहितीपूर्ण भाषण केले. कार्यक्रमाला देवस्थानच्या विश्वस्त चारुता भिडे, शीतल दाबके आदी उपस्थित होते.
१९७१-७२ मध्ये देवरायांचा अभ्यास सुरू करणारे वा. द. वर्तक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानाला सुरवात झाली. या वेळी त्यांचे सुपुत्र जिओलॉजिस्ट अजित वर्तक उपस्थित होते. डॉ. गोडबोले म्हणाल्या, देवराया म्हणजे देवाच्या नावाने राखीव ठेवलेले पवित्र जंगल. कोकणात याला ‘देवरहाटी’ असेही म्हणतात. पूर्वी गावांनी एकत्र येऊन या जंगलांचे रक्षण केले; मात्र गेल्या काही दशकांत नव्या मंदिर बांधकामासाठी देवराया तोडण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यांनी वाशीतर्फे संगमेश्वर येथे स्थानिकांच्या सहकार्याने वाचवलेली एक देवराई, गुहागर तालुक्यातील नरवण गावातील ३००-४०० वर्षे जुने खिळे न वापरता बांधलेलं लाकडी मंदिर, पिंपळनेर येथील पूजनीय पिंपळाचे झाड अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. कोसुंब येथील बेड्याच्या झाडांनी व हॉर्नबिल पक्ष्यांच्या घरट्यांनी भरलेली देवराई, कसबा सप्तेश्वर व कोरले येथील बकुळीच्या झाडांनी समृद्ध देवराया, श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील समृद्ध देवराई यामध्ये असलेली जैवविविधता ही आपल्या वारशाची शान आहे, असे त्या म्हणाल्या.
देवरायांमध्ये असलेली पाण्याची कुंड, औषधी वनस्पती, प्राणिजीवन व शिल्पकला यांची वैशिष्ट्य़े त्यांनी स्पष्ट केली. बेडा हे फळ औषधात वापरले जाते हे पटवून देऊन आम्ही अनेक देवराया वाचवल्या. परंपरेत ‘चकवा लागणे’ किंवा ‘क्षेत्रपाल’ अशा धार्मिक संकल्पना कदाचित याच रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी रुजवल्या असतील, असेही त्यांनी सांगितले.
समारोपात डॉ. गोडबोले म्हणाल्या, देवराया जपणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर आपली जगण्याची गरज आहे. त्यांचे नुकसान म्हणजे आपल्या भविष्यातील पिढ्यांचे नुकसान. कार्यक्रमाच्या शेवटी देवस्थानच्या विश्वस्त भिडे यांनी श्रीफळ देऊन डॉ. गोडबोले यांचा सत्कार केला. उपस्थित श्रोत्यांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला.

चौकट
आजचे व्याख्यान

डॉ. नीलम माणगावे
कवयित्री- लेखिका
विषय : छोट्यांच्या मोठ्या गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com