हत्ती प्रश्नावर तोडगा काढू
84315
84316
सिंधुदुर्गातील हत्ती प्रश्नावर लवकरच तोडगा
वनमंत्री गणेश नाईक ः बैठक घेण्याची आमदार केसरकरांना ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः हत्ती उपद्रवाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल. यासाठी आवश्यक बैठकही लवकरच घेऊ, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांना दिली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रस्तावित प्रकल्प आणि अन्य प्रश्नांसंदर्भात आमदार केसरकर यांनी पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री नाईक व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली. चारही मंत्र्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आणि प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात आमदार केसरकरांना सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच काही प्रश्नांवर विशेष बैठकीचे आयोजनही करणार असल्याचे आश्वासित केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ले) येथे प्रस्तावित असलेल्या ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प व निवती समुद्रात निवती रॉक येथे प्रस्तावित सबमरीन पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आमदार केसरकरांनी पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही प्रकल्पांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे दोन्ही प्रकल्प तातडीने पूर्ण होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी यावेळी मंत्री देसाई यांच्याकडे केली. दोन्ही प्रकल्पांना चालना देऊन ते लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली. या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले. इतर प्रस्तावित आणि मंजूर झालेल्या पर्यटन प्रकल्पांवरही या भेटीत चर्चा करण्यात आली. पर्यटनमंत्र्यांनी या सर्व प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सर्व पर्यटनस्थळांसाठी आवश्यक प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
वनमंत्री नाईक यांचेही विविध प्रश्नांसंदर्भात आमदार केसरकरांनी भेट घेत लक्ष वेधले. मुंबई येथे त्यांच्या दालनामध्ये झालेल्या चर्चेमध्ये मुख्यतः आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावांतील कबलायतदार गावकर जमिनीस ‘खासगी वन’ असा असलेला शेरा कमी करून ती लाभधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाकडून सादर केलेल्या वनखात्याकडील प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी मागणी केली. यावर या प्रस्तावाला मान्यता देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवाबाबत उपायोजना करण्यासाठी हत्ती पकड मोहीम राबवण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर तातडीने निर्णय घ्यावा. आवश्यक बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार केसरकरांनी केली. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देताना पुढील आठवड्यात बैठक आयोजित करून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही केसरकरांनी भेट घेत मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्प येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित ॲम्युझमेंट प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प लवकर मार्गी लावून कार्यान्वित होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली. मंत्री महाजन यांनी, या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगितले. शिरशिंगे येथील मंजूर धरण प्रकल्पाला उद्भवणाऱ्या समस्येवरही तोडगा काढून हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी आश्वासित केले.
-------
कबुलायतदार गावकर प्रश्नाकडेही वेधले लक्ष
आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमिनीवरील वनखात्याची नोंद कमी करण्याबाबत शासन निर्णय झाला असून, त्याबाबत लवकर अंमलबजावणी होण्यासाठी वनमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करावी, अशी मागणी आमदार केसरकरांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली. मंत्री बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेतली. यावेळी पुढील आठवड्यात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल व कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप लवकर करण्याची ग्वाही दिली. यावेळी ही गावे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने या गावांची मोजणी पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी अडचण येत आहे, त्यामुळे या गावांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून तसेच प्रशिक्षित पथकामार्फत करण्याचे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य प्रशासनास उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार केसरकरांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.