चार तास रंगला अनोखा अष्टावधानी कार्यक्रम
rat१४p१०.jpg-
२५N८४४३२
रत्नागिरी : संस्कृत भारती आयोजित अष्टावधानी कार्यक्रमात बोलताना अवधानी डॉ. उमामहेश्वर ना. सोबत प्रश्न विचारणारे तज्ज्ञ.
-----
रत्नागिरीत चार तास रंगला रंगला अष्टावधानी कार्यक्रम
संस्कृत भारतीतर्फे आयोजन ः डॉ. उमामहेश्वर यांची दिव्यप्रतिभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : एकाच वेळी शीघ्र काव्य रचणे, दिलेल्या विषयावर काव्य करणे, अप्रस्तुत प्रश्नांना उत्तरे देणे, कोणत्याही श्लोकाचे विवेचन, फलक न बघता संख्याबंध पूर्ण करणे अशा आठ कलांचा आविष्कार अष्टावधानी डॉ. उमामहेश्वर ना यांनी साकारला. निमित्त होते संस्कृत भारतीच्या संस्कृत सप्ताहातील अष्टावधान कार्यक्रमाचे. झाडगाव येखील माधवराव मुळे भवनात हा कार्यक्रम चार तास रंगला. उद्घाटन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी केले.
डॉ. उमामहेश्वर यांना महाबलभट्ट (अप्रस्तूतप्रसंग), डॉ. दिनकर मराठे (आशुकाव्य), डॉ. कल्पना आठल्ये (संख्याबंध), योगिता केळकर (निषिद्धाक्षरी), मयूरी जोशी (दत्तपदी), चैतन्य पाडळकर (समस्यापूर्ती), राजेश कुमार (चित्रकाव्य) आणि मैत्रेयी आमशेकर (काव्यवाचन) यांनी प्रश्न विचारले. केळकर यांनी ग, र, म आदी वेगवेगळी अक्षरे वगळून काव्य करण्याची अट घातली. तेव्हा डॉ. उमामहेश्वर यांनी सुरेख काव्य केले. चित्रकाव्यामध्ये हारबंध म्हणजे फुलांच्या पाकळ्यांमध्ये शब्दरचना करत श्रीलो भालो.. हे धन्वंतरिस्तुती हारबंध काव्य डॉ. उमामहेश्वर यांनी रचले. डॉ. आठल्ये यांनी भगवद्गीतेमधील भगवान् श्रीकृष्णांच्या श्लोकांची संख्या ५७४ असल्याचे सांगून हा संख्याबंध ५x५ तक्त्यामध्ये बसवण्यासाठी प्रश्न विचारले. न बघता व चार फेऱ्यांमध्ये उभ्या व आडव्या संख्येची बेरीज ५७४ करण्याचे मोठे आव्हान डॉ. उमामहेश्वर यांनी लीलया पेलले. अप्रस्तुत प्रसंगातील प्रश्न महाबलभट्ट यांनी विचारून डॉ. उमामहेश्वर यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी रंजकतेने उत्तरे दिली.
चौकट १
स्मरणशक्तीने जिंकली मने
अष्टावधान कला भाषेच्या विविधांगी अभ्यासाचा उत्तम आविष्कार असल्याचे डॉ. उमामहेश्वर यांनी दाखवून दिले. डॉ. उमामहेश्वर यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, उत्तम धारणाशक्ती, स्मरणशक्ती, काव्यरचनेचे सामर्थ्य आणि हजरजबाबीपणा अनुभवता आला. चेहऱ्यावर नम्रता आणि प्रत्येकाच्या प्रश्नांना न रागावता समर्पक उत्तरे दिली त्यामुळे उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.
---