भारताचे गौरवगान स्पर्धा जल्लोषात

भारताचे गौरवगान स्पर्धा जल्लोषात

Published on

भारताचे गौरवगान स्पर्धा जल्लोषात
रत्नागिरी ः भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. या निमित्ताने नवनिर्माण हायस्कूलने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १२ ऑगस्टला आंतरशालेय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते ९ वी. स्पर्धेचे उद्‍घाटन ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. मनोगतात त्यांनी देशभक्ती म्हणजे काय, याची माहिती देताना शाळेने अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करावे असा संदेश दिला. या समारंभासाठी कोस्टगार्डच्या पूनम थापा जुनगरे (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये नऊ शाळांचा सहभाग होता. प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय पारितोषिक जगद्‍गुरू नरेंद्राचार्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, तृतीय पारितोषिक नवनिर्माण हायस्कूल आणि उत्तेजनार्थ माने इंटरनॅशनल स्कूलला मिळाले तसेच माध्यमिक गटात माने इंटरनॅशनल स्कूल प्रथम पारितोषिक, फाटक हायस्कूल द्वितीय, शिर्के गुरुकुलने तृतीय तर नवनिर्माणला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

84468
कबनूरकर स्कूलमध्ये अखंड भारताचे स्मरण
साखरपा : कबनूरकर स्कूलमध्ये अखंड भारत अभियानअंतर्गत देश विभाजनाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे विनोद केतकर यांनी अखंड भारताचा इतिहास कथन केला. १४ ऑगस्ट हा दिवस देशविभाजनाचा स्मृतीदिन म्हणून देशात पाळला जातो. त्यानिमित्त अखंड भारत संकल्पनेचे स्मरण केले जाते. असाच एक कार्यक्रम कबनूरकर स्कूल इथे आयोजित करण्यात आला. प्रमुख वक्ते विनोद केतकर आणि मुख्याध्यापिका लीना कबनूरकर यांनी अखंड भारताच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी केतकर यांनी देशाच्या बाराशे वर्षांच्या गुलामीची आठवण करून दिली. राष्ट्रविभाजनासारखा घटना टाळायच्या असतील तर प्रत्येकाने त्याचे त्याचे कर्तव्य नीट केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देश पुन्हा एकसंध होईल तोच खरा स्वातंत्र्यदिन असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

84479
साखरप्यातील कंट्रोल केबिन धोकादायक
साखरपा ः साखरपा एसटी स्थानकात तात्पुरते उभारलेले कंट्रोल केबिन अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या केबिनमध्ये मोठ्या विद्युतदाबाचे मीटर आणि अन्य उपकरणे बसविली आहेत. पत्र्याची ही केबिन त्यामुळे धोकादायक ठरत आहे. साखरपा एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे जुन्या इमारतीतील कंट्रोल केबिन वापरात नाही. सध्या हे कार्यालय तात्पुरत्या केबिनमध्ये स्थलांतरित केले आहे. पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे; पण ही शेड अत्यंत धोकादायक ठरत आहे. या शेडमध्ये इलेक्ट्रिकचे सगळे मीटर आणि बटणे बसवण्यात आली असली तरी ती सगळी विद्युत उपकारणे उच्च विद्युत्‌दाबाची आहेत. यामध्ये थ्री फेज वायरिंगचीही जोडणी आहे. मुळातच ही केबिन पत्र्याची असल्यामुळे तिच्यात अशी उच्चदाबाची उपकरणे बसवणे धोकादायक आहे. यामुळे या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होण्याचे किरकोळ प्रकार झाले आहेत. याविषयी देवरूख आगारात सांगूनही त्या विषयी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मोठा अपघात झाल्यावरच महामंडळाला जाग येणार का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

सराफ विद्यालयात गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शन
चिपळूण ः रोटरी क्लब लोटे व दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यावतीने लोटे येथील कविता विनोद सराफ विद्यालयात गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दुर्गवीर प्रतिष्ठानने कष्टाने गडकिल्ल्यांचे जमावलेले दुर्मिळ फोटो प्रदर्शनात ठेवले. ते करत असलेले गडकिल्ले संवर्धनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये आपला इतिहास कळावा तसेच या क्षेत्रात रूची वाढावी या हेतूने दुर्गवीर प्रतिष्ठानचे राकेश इंदुलकर यांनी उपयुक्त माहिती दिली. राजे शिवछत्रपती व शंभूराजे यांचा काळ कसा होता, याचे वास्तववादी चित्रे दाखवण्यात आली. रोटरीचे अध्यक्ष संदीप सुर्वे यांनी मुलांना आपल्या गडकिल्ल्यांची व्यापक माहिती होण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मुलांना आपला इतिहास कायम अशा गडकिल्ले संवर्धनातून टिकवला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. मुख्याध्यापक बसवंत यांनी दुर्गवीर व रोटरी क्लबचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com