रेडीत अवैध मायनिंगचा आका कोण0

रेडीत अवैध मायनिंगचा आका कोण0

Published on

swt1439.jpg
84565
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर.

रेडीत अवैध मायनिंगचा आका कोण?
संदेश पारकर ः गणेश चतुर्थीनंतर जनआंदोलन उभारणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः तालुक्यातील सातार्डा तर्फे साटेली व वेंगुर्ले तालुक्यातील रेडीमध्ये खोटी कागदपत्रे रंगवून अवैध मायनिंग उत्खनन सुरू आहे. या सगळ्या प्रकाराचा आक्का कोण? असा प्रश्न ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे उपस्थित केला. लवकरच त्यासंदर्भात आवाज उठविण्यात येणार असून तेथील जनतेला विश्वासात घेऊन गणेश चतुर्थीनंतर मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी जिल्हा दौऱ्यामध्ये वाळू माफियांसह अवैध उत्खनन तसेच चुकीच्या कामांची चौकशी करून कारवाईची भूमिका मांडली. त्यांनी मांडलेली भूमिका सत्यात उतरल्यास जिल्हावासीयांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. पारकर यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे होत आहेत तर दुसरीकडे अवैध मायनिंगसारखे उत्खनही सुरू असून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला जात आहे. मी या संदर्भात अनेक पत्रव्यवहार येथील महसूल प्रशासनाकडे तर प्रत्यक्ष महसूल मंत्र्यांकडेही केले. सासोली (ता. दोडामार्ग) सारख्या जमीन घोटाळ्याबाबत अनेक आंदोलने केली. मात्र, असे असताना सुद्धा हे प्रकार कुठे थांबताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असे प्रकार उघडकीस येत आहेत. सद्यस्थितीत सातार्डा तर्फे साटेली तसेच रेडी या ठिकाणी खोटे कागदपत्रे बनवून मोठ्या प्रमाणात अवैध मायनिंग उत्खनन सुरू आहे. साटेली सातार्डा ठिकाणाहून जवळपास चार ते पाच टन साठा आतापर्यंत परदेशात पाठवला आहे. याकडे महसूल प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. मात्र, या अवैध उत्खननाची तसेच त्याच्या वाहतुकीची चौकशी करण्याची जबाबदारी महसूलची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? या मागचा आक्का कोण? हे शोधणे गरजेचे असून लवकरच याबाबत आवाज उठविताना तेथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन गणेशोत्सवानंतर मोठे जनआंदोलन उभारले जाईल.’’
श्री. पारकर पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात जमीन घोटाळे, अवैध उत्खननसारखे प्रकार घडत असताना त्यामध्ये अधिकाऱ्यांनी बळी न पडता आपली जबाबदारी, कर्तव्य पार पाडले पाहिजे. मात्र, या ठिकाणी तसे होताना दिसत नाही. महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी या ठिकाणच्या वाळू माफिया तसेच विविध प्रश्न संदर्भात वक्तव्य केली. या ठिकाणी अवैध उत्खननाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, ते यासंदर्भात आपल्याकडे कुठली तक्रारच नाही म्हणत असतील तर सासोली जमीन घोटाळा प्रकरणाच्या अनेक तक्रारी मी प्रशासनासह शासन स्तरावर केल्या आहेत. त्यामुळे बावनकुळे यांनी ज्याप्रमाणे भूमिका मांडली ती भूमिका प्रत्यक्षात उतरल्यास मी त्यांचा जिल्हावासीयांच्या वतीने जाहीर सत्कार हे करू.’’

चौकट
श्वेतपत्रिका जाहीर करा
जिल्ह्यातील अवैध उत्खनन, जमीन घोटाळे आदी प्रकरणांमध्ये महसूल प्रशासन नेमके का बळी पडतो? हाच मुद्दा आहे. त्यामुळे शासनाने गेल्या पंधरा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या जमिनीची खरेदी-विक्री झाली, कुठल्या जमिनी कुठल्या कंपनीला विकल्या?, किती परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्या? तर किती जमिनी शिल्लक राहिला याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही श्री. पारकर यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com