सदर-ग्रामदेवतेचा शिमगा

सदर-ग्रामदेवतेचा शिमगा

Published on

गावच्या मालका .........लोगो
(३ ऑगस्ट पान ६)
---
ग्रामदेवतेचा शिमगा

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात गणपती अन् शिमगा हे सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातही ग्रामदेवताचा शिमगा हा फाल्गून महिन्यात येणारा सण तर अतिशय उत्साह, आनंदात साजरा केला जातो. फाकपंचमीपासून शिमग्याला सुरुवात होते आणि त्याची सांगता नववर्षारंभी म्हणजे गुढीपाडव्याला होते.

-rat१६p२३.jpg-
२५N८४७३४
अप्पा पाध्ये-गोळवलकर
---
फाकपंचमीच्या दिवशी प्रत्येक वाडकरी ढोलताशा वाजंत्रीच्या गजरात सावरीचे छोटेसे झाड तोडून आणतात अन् ते झाड मध्ये उभे करून भोवती कवळ-गवत रचतात. मग फाका घालून ती वाडीची होळी पेटवतात. असे रोज दहा दिवस म्हणजे शिमग्यापर्यंत चालते. मग येतो शिमगा. आदल्या दिवशी सारा गाव भलेमोठे सुरमाड वा आंब्याचे झाड तोडून गावच्या देवळात वा सहाणेवर उभे करतात. या दिवशी कोणीही म्हावरंमटण, दारू पित नाहीत म्हणून त्या दिवसाला गोडेसण म्हणतात; पण दुसऱ्या दिवशी तिखटे सण. गायगरिबाकडेही या दिवशी वशाट असणारच.
शिमगा साजरा झाला की, देवाची पालखी गावभोवणीस निघते. मानाप्रमाणे घरे घेऊन झाली की, देव राजांगणी जातो. रूपे भंडारली जातात अन् देवापाशी कौल घेतला जातो. कौल म्हणजे मूर्तीच्या ठराविक अवयवांवर पपईचे कळे किंवा भातगोटे नाहीतर निगडीची पाने चिकटवली जातात आणि देवाला विनवले जाते की, उद्या आम्ही रानात पारधीला जात आहोत तर गोडा सड (भेकर) मिळेल का? तर देवा तू वनीच्या मालकाचा, तुझ्या सर्व गणांचा, शिपायांचा विचार घे आणि उजवी कळी दे. ती उजवी कळी खाली पडली की, मग कडव्या सडासाठीही (डुक्कर) कौल घेतला जातो आणि मग देवळातच वस्ती केली जाते. त्याला बैठक धरणे म्हणतात. दुसऱ्या दिवशी भल्यापहाटे सारे गावकरी देवाला आळवणी करून जाबसाल करून जंगलात जातात. जंगल बांधले जाते म्हणजे उंच झाडांकर टेली (टेहळे) चढून योग्य जागी बसून सावज कुठे जात्येय याची माहिती ओरडून देत असतो. त्यानुसार पारधी आपली दिशा ठरवतो. पन्नास-साठ कुत्री असतातच. सोबत झुंजुमुंजू होताना काढ्यात भेकर उठले की, शिकार होण्याचे चान्सेस वाढतात कारण, भेकरे चरून आलेले असते आणि त्याला रवंथ करायला संधी मिळालेली नसते. त्यामुळे ते लवकर दमते हे एक आणि पारधीही ताजातवाना असतो. त्यामुळे तोही जोशात असतो मग भेकरं मारले जाते. जिथे मारले जाते तिथूनच त्याची ढोलवाजंत्र्यांच्या गजरात मिरवणूक निघते ती ग्रामदेवताच्या राउळापर्यंत. मग ती शिकार कापून त्याचा नैवेद्य मुख्य देवतेच्या गणाना, शिपायांना दाखवून साऱ्या गावातील कुटुंबांना वाटा दिला जातो. एकेक फोडही वाटणीस येते; पण तो प्रसाद आहे अशी श्रद्धा असते.
या पारधीत भांडणेही होतात. रानातील जनावरच ते, कधीकधी दुसऱ्या गावातही जाते. त्या गावचीही पारध असेल तर त्या पारध्यांना हे दमलेले सावज आयते मिळते मग हे आमचे सावज आहे, असे एक पार्टी म्हणते तर दुसरी आपला हक्क सांगते. प्रकरण हमरातुमरीवर येते; पण दोन्ही बाजूची सुजाण लोकं त्यातून मार्ग काढतात; मात्र कटुता राहतेच. हल्ली मात्र जंगले खूप दाट झाल्याने आणि पारध्यांजवळ ती ईरई न राहिल्याने सावज मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच भेकर हे संरक्षित प्राण्यामध्ये असल्याने बंधने आली आहेत. त्यामुळे ती पूर्वीची पारधीची मजा, पारधीदरम्याने एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शिव्या, तो कैफ हे सारं लयाला जात आहे याची खंत आहेच. माझ्या पिढीने या पारधींचा आनंद घेतलाय; पण आता मात्र त्या आठवणींवर आनंद मानावा लागतो आहे, असो कालाय तस्मै नम:

(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com