मुख्यालयात विविध ११ आंदोलने
84753
सिंधुदुर्गनगरी ः आरोग्य सेवक महिला सरळ सेवा पद भरतीतील पात्र उमेदवारांनी तत्काळ नियुक्तीसाठी उपोषण केले. पालकमंत्री नीलेश राणे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप; शंभर आंदोलने थंडावली
मुख्यालयात केवळ ११ आंदोलने; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चेतून प्रश्न निकाली
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी तब्बल १११ आंदोलने होणार होती. मात्र, पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यापूर्वीच बैठकीचे आयोजन करून त्यांचे प्रश्र सोडविल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनासमोर केवळ ११ आंदोलने झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आजही विविध प्रश्न भेडसावत आहेत. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केला जात असल्याने सर्वसामान्य जनतेकडून १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी आंदोलने केली जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यातील जनतेकडून विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्टला आंदोलन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १११ निवेदने प्राप्त झाली होती. याची दखल घेत पालकमंत्री राणे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. १४) सर्व उपोषणकर्त्यांना निमंत्रित करीत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांच्याशी थेट संवाद साधत व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी जनतेच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांचे प्रश्न सोडवले. काही समस्यांबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे १५ ऑगस्टच्या आंदोलनांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनासमोर केवळ ११ आंदोलने, उपोषणे झाली.
कंत्राटदाराचे उपोषण
१५ व्या वित्त आयोगातील कामे पूर्ण करूनही देयक दिली नसल्याने कुंदे येथील शुभम पेडणेकर या कंत्राटदाराने जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण केले. पेडणेकर यांनी पावशी ग्रामपंचायतअंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तीन कामे केली होती. मात्र, कामाची देयके मिळाली नसल्याने उपासमारीची पाळी आली असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर २०२३ मध्ये ही कामे पूर्ण केली, मात्र दोन वर्षे उलटली तरी ग्रामपंचायतीकडून बिल काढण्यात विलंब होत आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.
तुळसवासीयांचे पुलासाठी उपोषण
तुळस घाटरस्त्यावरील धोकादायक पुलामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा, या मागणीसाठी तुळस येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यात नितीन लिंगोजी, रामचंद्र पवार, सलील लिंगोजी, सिद्धेश नाईक, केशव मेत्री, प्रवीण रेडकर आदी सहभागी झाले.
................
आंबेडकर स्मारकासाठी जागेची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जमीन मिळावी, या मागणीसाठी नेरुर येथील माजी सरपंच सखाराम कदम यांनी उपोषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने कुडाळ येथे स्मारकासाठी शासनाकडून १० गुंठे जागा मिळावी, अशी मागणी कुडाळ तालुका आंबेडकर समाज बांधव अनुयायी यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव दिला, मात्र कार्यवाही झाली नाही. स्मारकाच्या जागेचा जाहीरनामा प्रसिद्ध करा, तालुका भूमिअभिलेख यांनी जागेची मोजणी नकाशा करण्याचे आदेश द्यावे. या जागेचा सातबारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा समिती कुडाळ यांच्या नावे करा. महसूल विभागाला सहकार्य करायला सांगा, आदी मागण्या केल्या.
......................
फाईल गहाळप्रश्नी उपोषण
सातोळी सजा दाणोली (ता. सावंतवाडी) येथील फेरफार क्रमांक ५९७ मंजुरीची फाईल मागणी करूनही ती देण्यात आली नाही. त्याबाबत फेरफार क्रमांक ५९७ मंजूर फेरफारातील मिळकतीची फाईल व नोंद मंजूर पुराव्याचे कागदपत्र आढळत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी जमीन महसूल अधिनियमाची पायमल्ली केली, असा आरोप करीत सातोळी येथील आत्माराम तायशेटे यांनी उपोषण करीत लक्ष वेधले.
..............
निवृत्त शिक्षिकेचा ठिय्या
वेंगुर्ले कॅम्प म्हाडा कॉलनी येथील निवृत्त शिक्षिका नीलिमा प्रभू यांनी पेन्शन व भविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी उपोषण करीत लक्ष वेधले. संबंधित निधी मिळण्यास चार वर्षे आठ महिने विलंब झाल्यामुळे या विलंब कालावधीतील व्याज मिळालेले नसल्याने ते मिळण्याकरिता तसेच २००९ पासून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ न मिळाल्याने शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.
...............
चुकीच्या नोंदींवर बोट
पडेल तलाठ्यांनी चुकीच्या नोंदी केल्याबद्दल वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेत नसल्याने पडेल कॅन्टीन येथील संदीप वाडेकर यांनी उपोषण केले. याबाबत कोकण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध महसूल मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. या अपिलाबाबत विभागीय कोकण आयुक्तांनी दिलेले निर्णय रद्द केले. त्याविरुद्ध रिटपिटीशन दाखल केले आहे. हे पिटीशन अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना व कोणताही आदेश नसताना फेरफार दुरुस्ती केली व आपल्यावर अन्याय होऊन आपले अतोनात नुकसान झाले आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
.......................
रेडीतील निवृत्त पोलिसाचे उपोषण
रेडी हुडावाडी येथील रहिवासी असलेले निवृत्त पोलिस रमेश राणे यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने आपण दिलेल्या मागणीची अद्यापही चौकशी केली नाही, त्यामुळे ही चौकशी व्हावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
.......................
सार्वजनिक प्रश्नांवर करलकरांचे उपोषण
कोचरा (ता. मालवण) येथील प्रसाद करलकर यांनी विविध सार्वजनिक प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी शासकीय कामकाजाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे, कार्यालयात हालचाल रजिस्टर. सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवणे. फिरतीवर जाताना ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर नोंद करूनच जाणे, रस्ते निर्धोक बनविणे, बेकायदेशीर रस्ते खोदाईबाबत कारवाई करणे, कोचरे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासकीय कामाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे, या मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
.......................
उत्खनन चौकशीची मागणी
अवैध उत्खननाचा सर्व्हे न केल्याने संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी निगुडे येथील महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. सोनुर्ली येथे अवैध उत्खनन झालेले असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी वारंवार केली. ती चौकशी केल्याबाबत ईटीएस तपासणी व्हावी, अशी मागणी केली.
..........................
भरतीतील पात्र उमेदवारांचे उपोषण
आरोग्य सेवक महिला सरळ सेवा पद भरतीतील पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. गेले वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार, तसेच लक्ष वेधूनही अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
...........................
माजी सैनिक गावडेंचा ठिय्या
देशासाठी आयुष्यभर सेवा दिलेल्या माजी सैनिकाला आपल्या जन्मगावातील एका साध्या रस्त्यासाठी दारोदार फिरावे लागत असल्याची शोकांतिका चौकुळ खासकीलवाडी येथील माजी सैनिक असलेले विठ्ठल मालू गावडे यांनी मांडली. स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून त्यांनी आज जिल्हा परिषदेसमोर या मागणीच्या न्यायासाठी उपोषण करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.