ःरेल्वे गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडा

ःरेल्वे गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडा

Published on

गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडा
सचिन वहाळकर ः चाकरमान्यांना दिलासा द्या
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्‍या गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केली आहे. विशेषतः जनशताब्दी, तुतारी, आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजरसारख्या कायम गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे वहाळकर यांचे म्हणणे आहे.
सध्या अनेक गाड्यांमध्ये आसनक्षमता कमी असल्याने प्रवाशांना आरक्षण मिळत नाही ज्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य होत नाही. जुन्या रचनेच्या गाड्यांमध्ये २४ डबे बसवता येत होते तर नव्या गाड्यांमध्ये २२ डबे आहेत. यामुळे काही गाड्यांमध्ये पूर्वीपेक्षा कमी डबे असल्याने गर्दीची समस्या वाढली आहे.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ही गाडी सध्या १७ डब्यांची धावते आणि कायम हाऊसफुल्ल असते. यात आणखी ५ डबे वाढवल्यास ती २२ डब्यांची होईल, ज्यामुळे जवळपास ५००हून अधिक प्रवाशांना सोईस्कर प्रवास करता येईल. जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी दिवसा धावणारी असून प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती नेहमीच पूर्ण भरलेली असते. सध्या १६ डब्यांची असलेल्या या गाडीत ५ ते ६ डबे वाढवल्यास जवळपास ३०० ते ४०० प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते. वाढीव डब्यांसह १९ किंवा २० डब्यांची जनशताब्दी तिच्या वेगात कोणताही बदल न होता धावू शकेल. सावंतवाडी ते दादर धावणारी तुतारी एक्स्प्रेस ही गाडी कोकणवासीयांसाठी महत्त्वाची आहे आणि तिला नेहमीच प्रचंड गर्दी असते. सध्या १९ डब्यांची असलेली ही जुन्या डब्यांची गाडी आहे. यात अतिरिक्त ५ डबे वाढवून ती २४ डब्यांची केल्यास ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची सोय होऊ शकेल.
---
चौकट
हंगामी गाड्यांमुळे विलंब
सणासुदीच्या काळात आणि सुटयांमध्ये सोडल्या जाणाऱ्‍या अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. यामुळे नियमित वेळेवर धावणाऱ्‍या गाड्यांना एक ते दोन तास उशीर होतो आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. या समस्येवरही तोडगा काढण्याची गरज आहे.

कोट
कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या नेहमीच तुडुंब भरलेल्या असतात आणि अचानक प्रवास करण्याची वेळ आल्यास आरक्षण मिळणे खूप कठीण होते. आता आरक्षण नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. त्यामुळे जादा डब्यांची नितांत गरज आहे. चिपळूण रेल्वेस्थानकावर काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा यासाठी कोकण रेल्वेने सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
- संतोष जाधव, काविळतळी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com