पर्यावरण पूरक उत्सव काळाची गरज
वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
rat17p1.jpg-
84892
प्रशांत परांजपे
इंट्रो
पर्यावरणपूरक उत्सव आणि जीवनशैलीचा अंगीकार केल्यास शाश्वत आणि स्थिर जीवनशैली सहजी प्राप्त होऊ शकते; मात्र त्याकरिता सर्वांच्या मानसिक बदलाची नितांत गरज आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
--------
पर्यावरण पूरक उत्सव काळाची गरज
पर्यावरणपूरक उत्सव म्हणजे शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करणारा आणि परंपरा जपणारा असा उत्सव. परंपरांना आधुनिकतेची झालर लागल्यामुळे पर्यावरणावर विचित्र परिणाम होतो. प्लास्टिक प्रदुषणाचा काही भाग आपण मागील भागात पाहिला. त्यातील पुढचा भाग आहे ध्वनी प्रदूषण. कार्यक्रम म्हटला की, धनिक्षेपक आलाच; पण त्याची मर्यादा किती असावी याबाबत आपण कोणताच मुलाहिजा बाळगताना दिसत नाही. परंपरा जपायच्या असतील तर पारंपरिक वाद्यांचा वापर आणि पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने निर्मळतेने जी मंगल वाद्य वाजवली जात होती, त्यांचा अंगीकार करणं अत्यावश्यक आहे. काळाची गरज आणि लागलेल्या संशोधनानुसार आपण ध्वनीक्षेपक वापरतो. मात्र शंभर व्यक्ती असताना पाच हजार व्यक्तींना ऐकु जाईल एवढ्या आवाजातील ध्वनिक्षेपकाची पातळी ठेवली जाते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. मोठ्या आवाजामुळे हृदयविकार, कर्णबधिरता असे विविध आजार उद्भवतात. प्रसंगी अतिआवाजामुळे मृत्यूही येतो. दुसरी गोष्ट ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थी, परीक्षार्थी, अभ्यासक, लेखक, वाचक आणि लेकुरवाळ्या बाळंतिणी व आजारी व्यक्ती यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्यांना मूलतः रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांचा रक्तदाब वाढतो आणि त्यांना प्रसंगी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. आनंदोत्सवामुळे दुसऱ्याच्या जीवनात मिठाचा खडा पडणार नाही, याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. परंपरांचे रक्षण करायचं असेल पूर्वजांचा आदर करायचा असेल तर त्याचे अनुकरण करणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
पर्यावरणपूरक उत्सव करताना पन्नास वर्षांपूर्वी आपल्याकडील उत्सवांमध्ये सजावटी करता कोणते समान वापरले जात होते. याची एक यादी तयार करावी म्हणजे अलगद लक्षात येईल. कागदाच्या पताका सद्यःस्थितीत प्लास्टिकच्या रेडिमेड पताका आणून बांधल्या जातात. कार्यक्रम संपल्यानंतर त्याचे करायचे काय म्हणून त्या कचऱ्यात टाकल्या जातात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे त्यांचे योग्य विघटन होत नाही. ज्या कमानी लावल्या जात होत्या त्या कमानीला स्वागतासाठी सुरमाड आणि सुरूच्या फांद्यांचा वापर केला जात होता. आजही आपण आपल्या समारंभप्रसंगी याचा वापर करू शकतो. टीकाकार म्हणतात, याचा वापर केल्यावर वृक्षतोड नाही का होणार0 कोणत्याही झाडाची फांदी तोडल्यानंतर ते झाड अधिक जोमाने वाढते हे शास्त्र सांगते. झाड तोडायचे नाही तर त्याची टावळी किंवा फांदी तोडायची. त्यामुळे त्या झाडाला कोणतीही इजा पोहोचत नाही.
वाढदिवसाच्या पार्टी करता ज्या टोप्या किंवा पाट्या वापरल्या जातात फ्लेक्सबोर्ड वापरले जातात ते देखील कचरा कुंडीत टाकले जातात आणि त्यामुळे प्रदुषणात वाढ होते. वापरलेल्या फ्लेक्सबोर्डपासून अतिशय सुंदर अशा पिशव्या आणि फोल्डर्स बनवता येतात. त्याला पर्याय म्हणून सद्यःस्थितीत अतिशय उत्तम असे कलाकार कापडावर रंगाने सुंदर बॅनर तयार करून देतात.
प्रसादासाठी जे द्रोण वापरले जातात ते कागदाच्या सिल्व्हर कोटिंगचे असतात त्यामुळे त्याचेही विघटन होत नाही. परंपरा जपायचे असतील तर पूर्वी चांदवडीच्या पानावर प्रसाद दिला जात होता किंवा केळीच्या पानाचे छोटे-छोटे फाळके काढले जायचे आणि त्यावर प्रसाद दिला जात होता. पानावर प्रसाद दिल्यामुळे एक आत्मिक समाधान तर मिळत होतेच आणि आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार केळीच्या पानावर गरम पदार्थ दिल्यामुळे किंवा चांदवडच्या पानावरचा पदार्थ खाल्ल्यामुळे अधिक पौष्टिकता प्राप्त होते.
आपण प्रसादाचे द्रोण वाटप केल्यानंतर आपल्या कार्यक्रम स्थळाच्या परिसरात पाहणी केली तर कुठेतरी झाडाच्या बुंधात सतरंजीवर इतस्ततः कोठेही छोटे छोटे कागदाचे बोळे पडलेले दिसून येतात आणि आपल्या स्वच्छ सुंदर अशा मंडपात दुरावस्था झाल्याचे लक्षात येते. हे टाळण्यासाठी आपण पानावरून प्रसाद दिला तर आरोग्याचेही रक्षण होते आणि प्रसाद घेतल्यानंतर ते पान टाकण्याची एक सामान्य व्यवस्था करून बादली किंवा टब ठेवला तरी त्या ठिकाणी येणारा पाहुणा प्रसाद घेतल्यावर ते पान त्यामध्ये सहजी ठेवेल. ते पान आपण ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीच्या खड्ड्यात किंवा एखाद्या गाईला देऊ शकतो. प्रसादाचे शिल्लक राहिलेले कागदाचे बोळे, डिश हा कचरा ज्या वेळेला आपण कुठेतरी फेकून देतो त्यावेळेला त्या ठिकाणी कुत्रे आणि गाय गुरे हे खाद्य म्हणून खाण्यासाठी येतात आणि त्यांच्या पोटामध्ये त्या शिल्लक अन्न कणांच्यासमवेत प्लास्टिक तुकडेही जात असतात आणि त्यामुळे त्यांनाही आजारांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रसादा करता कागदी द्रोण न वापरता पानांचा वापर करावा किंवा पानांपासूनचे बनवलेले द्रोण आता बाजारामध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत. सुपारीपासूनचे द्रोण आता उपलब्ध होऊ लागले आहेत त्याला गोंडस नाव म्हणजे इकोफ्रेंडली बाऊल. कोणताही खाद्यपदार्थ देण्याकरता किंवा मोठी पंगत घ्यायची असेल तरीदेखील पानांच्या पत्रावळी किंवा केळीच्या पानांचा आवर्जून वापर करणे अत्यावश्यक आहे. कागदी सिल्व्हर कोटेड प्लेट किंवा कागदी सिल्व्हर कोटेड पत्रावळीला हा अतिशय उत्तम असा पर्याय म्हणून सध्या वापरत आहे. सिल्व्हर कोटिंग असलेली डिश वापरली आणि त्यावर गरम पदार्थ ठेवला तर ते प्लास्टिक वितळून अन्ना समवेत आपल्या पोटात जाते आणि कॅन्सरसारखे आजार बळावू लागतात; पण आजकाल अनेक सण समारंभामध्ये बुफे पद्धतीचा अवलंब केला जातो. अशावेळी केळीच्या पानांचा किंवा पत्रावळींचा वापर करता येत नाही. अशावेळी स्टीलच्या मोठ्या डिश ताटल्या किंवा ताटांचा वापर करता येतो.
बुके आणताना प्लास्टिकमध्ये गुंडाळून त्या नाजूक फुलांना गुदमरून टाकणारा कागद लावून आणू नये. कारण, बुके प्लास्टिकशिवाय अधिक दिवस टिकतो आणि समजा कचराकुंडीत गेलाच तर प्लास्टीक आणि विघटनशिल फुलांचा गोंधळ होत नाही. महत्वाचे बुके कचराकुंडीत टाकताना फुले ओल्या कचऱ्यात आणि त्याचा प्लास्टिक बाऊल आणि स्पंज हे अविघटनशील कचराकुंडीत टाकावा. त्याहीपेक्षा कापडी बुके किंवा रोपटे देण्याची प्रथा आता बाळसे घेत आहे त्याचा स्वीकार सर्वांनी करणे आवश्यक आहे. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना फुले किंवा पूजा साहित्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅग आणि हळदीकुंकू, तांदळासाठीदेखील प्लास्टिकच्या छोट्या पिशव्या वापरल्या जातात आणि नंतर कोठेही फेकल्यामुळे प्रदूषणात वाढच होते. हे टाळण्यासाठी कागदी पुडी मध्ये याच वस्तू आणता येतात; पण तशी मानसिकता करायला पाहिजे. पर्यावरणपूरक उत्सवामध्ये सर्व प्रकारच्या यूज अँड थ्रो अर्थात एकल वस्तूंचा वापर टाळला तर स्थिर जीवनशैलीकडे यशस्वीपणे वाटचाल करण्यास समर्थ होऊ शकतो.
---------
(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त आहेत.)