कर्ण राजाने उभारलेले कसबा येथील कर्णेश्वर
श्रावण विशेष-------लोगो
rat17p16.jpg
84965
कर्णेश्वर मंदिर
rat17p22.jpg-
85021
कर्णेश्वर मंदिरातील सभा मंडप
-------------
अप्रतिम शिल्पकलेचा आविष्कार असलेले कर्णेश्वरम मंदिर
कसब्यातील शिवालय; पाच फूट उंचीच्या जोत्यावर बांधकाम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथून ३ किलोमीटर अंतरावरील कसबा गावामध्ये कर्णेश्वर हे एक सुंदर असे शिवालय आहे. सुमारे ४०० चौरस मीटरच्या फरसबंद आवारात ते मंदिर उभे आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, तर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूकडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकेक दार आहे.
कर्णेश्वर मंदिर ५ फूट उंचीच्या जोत्यावर उभे असून त्याला या जोत्यारूनच प्रदक्षिणा मार्ग सुद्धा केलेला आहे. पूर्वेच्या बाजूने मंदिरात प्रवेश करताना मुखमंडपाच्या पायऱ्यांच्या दोन बाजूंना देवकोष्ठे आहेत. त्यापैकी डावीकडच्या देवकोष्ठात शिवाची सिंहासह मूर्ती असून, उजवीकडील देवकोष्ठात नंदीसह शिव आहे. सिंहासह असलेल्या शिवाला ‘सिंहग शिव’ म्हणतात. इथून सभामंडपात प्रवेश केल्यावर समोर अंदाजे ६-७ फूट व्यासाची दगडी रंगशिळा दृष्टीस पडते. मंडपातील खांबांच्या रचनेमुळे सभा मंडपाचे नऊ भाग पडले असल्यामुळे या मंडपाला ‘नवरंग मंडप’ असे म्हणतात. या मंदिराच्या सभा मंडपात असलेले खांब, त्या खांबांवर आडव्या असलेल्या तुळ्या आणि या तुळ्या तोलून धरण्यासाठी दाखवलेले यक्ष.
सभामंडपात एका बाजूला सरस्वतीची मूर्ती तर दुसऱ्या कोनाड्यात स्थानक म्हणजे उभ्या स्थितीतील अनंतविष्णूची मूर्ती आहे. विष्णूच्या डोक्यावर इथे नागाने फणा धरलेला आहे. तसेच पुढे अंतराळात गेल्यावर डाव्या कोनाड्यात ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. गाभाऱ्याच्या उंबऱ्याला लागून एक गद्धेगळ ठेवलेला आहे. त्यावर शिलालेख कोरलेला दिसतो.
येथील दरवाजावर शेषशायी विष्णू असून त्याच्यावर दशावतारांचे केलेले अंकन प्रेक्षणीय आहे. इथे आठवा अवतार म्हणून कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला दिसतो. दशावतार शिल्पांच्या एका बाजूला समुद्रमंथन तर दुसऱ्या बाजूला कृष्णचरित्रातील दधीमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. या मुखमंडपाच्या चारही कोपऱ्यावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत.
मंदिराच्या प्राकारात सूर्य, गणपती यांची मंदिरे आहेत. यात सात घोड्यांच्या रथात उभी असलेली सूर्यमूर्ती आहे. मूर्तीच्या प्रभावळीत १२ राशींचे शिल्पांकन केलेले आहे. सूर्य मूर्तीचे हात भग्न झालेले होते. त्याचा जीर्णोद्धार करताना शिल्पकाराने तिथे नवीन हात बसवले. सूर्याच्या हातात खरेतर दोन कमळे असतात. परंतु शिल्पकाराने इथे एका हातात कमंडलु तर दुसरा हात अभय मुद्रेत दाखवला आहे.
85022
-------------
चौकट
वैशिष्ट्यपूर्ण मकरमुख
इथले अजून एक सौंदर्यस्थळ म्हणजे या मंदिरातील अभिषेकजल वाहून जाण्यासाठी मकरमुखाची रचना केलेली आहे. यावरूनसुद्धा मंदिराचे प्राचिनत्व समजून येते. नंतरच्या काळात मकरमुखाऐवजी गोमुख दिसू लागते. मगर गंगेचे वाहन आहे. त्यामुळे मगरीच्या तोंडातून येणारे जल हे प्रत्यक्ष गंगाजलच असते अशी दृढ श्रद्धा असल्याने हे मकरमुख कोरले जाते. कर्णेश्वर मंदिरातील मकरमुख नितांत सुंदर आणि प्रेक्षणीय आहे.
-------
चौकट
ही आहेत कर्णेश्वराची वैशिष्ट्ये
कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, याठिकाणी यक्षांच्या जागी काही देवता कोरलेल्या आहेत. गणपती, नरसिंह आणि वीणाधर गंधर्व यांच्या मूर्ती आपल्याला याठिकाणी ब्रॅंकेटवर दिसून येतात. नरसिंह तर फारच सुंदर कोरलेला आहे. खालच्या दोन हातांनी हिरण्यकश्यपुचे पोट फाडतो आहे, तर वरच्या दोन हातांनी तुळईचा भार तोलला आहे. वीणाधर गंधर्वही खालच्या दोन हातांनी तो वीणावादन करत आहेत, तर वरचे दोन हात तुळईला आधारासाठी लावलेले दिसतात. यक्षप्रतिमांऐवजी देवतांच्या प्रतिमा ब्रॅंकेटवर असणे हा अगदी आगळावेगळा प्रकार या मंदिरात पाहायला मिळतो.
----------
चौकट
85023
पालथे ताट
पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकलेला नाही. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.