चिपळूण, गुहागरमधील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

चिपळूण, गुहागरमधील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

Published on

चिपळूण, गुहागरमधील रिक्त पदे भरणार
पशु विभागाचे पत्र; मनसेच्या उपोषणाची दखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ः चिपळूण व गुहागर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ मधील कार्यक्षेत्रातील रिक्त पदे भरा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेने १५ ऑगस्ट रोजी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याबाहेर उपोषण केले. मनसेच्या या पवित्र्यानंतर पंधरा दिवसात रिक्त पदांवर भरती करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आले आहे. याबाबतचे पत्रही अधिकाऱ्यांनी दिले.
चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत गुरांसाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना व गुरांवरील उपचार याकरिता दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. शेतकऱ्यांची होत असलेली नुकसानी व जनावरांच्या हाल अपेष्टा याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ताळ्यावर आले आहेत.
मनसे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक होणार असून त्यावेळी योग्य निर्णय होणार आहेत. शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, तालुकाध्यक्ष सागर चिले, मनसेचे नेते प्रमोद गांधी, जितेंद्र चव्हाण यांच्या कडक भूमिकेमुळे प्रशासन जागेवर आले आहे. या मागणी करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेतर्फे गेली अनेक महिने पशुसंवर्धन खात्याकडे मागणी करण्यात येत होती १६ जुलै २०२५ रोजी मागणी केली होती. ते निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते.
पशुसंवर्धन विभागाकडून काहीच उपाययोजना न झाल्याने शुक्रवारी मनसेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले. त्यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता थातूरमातूर उत्तर दिली गेली. अखेर पशुधन विभागाचे सहाय्यक उपायुक्त दत्तात्रय सोनावले यांनी मुंबई कार्यालयातील पशुधन विभागाचे मुंबई कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त श्री. कांबळे यांच्याशी मनसे नेते जितेंद्र चव्हाण यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यावेळी झालेल्या समाधानकारक चर्चेमुळे मनसेच्यावतीने उपोषण स्थगित केले. याबाबत पंधरा दिवसानंतर आयोजित बैठकीत तोडगा निघून उपाययोजना केल्या जाणार आहेत अशा आशयाचे पत्र सहाय्यक उपायुक्त डॉ. दत्तात्रय सोनावले यांनी सागर चिले यांना दिले.
-----
चौकट
या आहेत मनसेच्या मागण्या
उपचाराअभावी काहीवेळा गुरे मृत पावतात. गुरांसाठी दवाखाना नाही, असंख्य ठिकाणी पशुधन अधिकारी नाहीत, गुरांसाठी औषधाचा साठा नाही, पशुधन अधिकारी पद रिक्त आहेत, अचानक आजारी पडलेल्या जनावर आपत्कालीन सेवा मिळत नाही, जनावरांवरील आजाराचे निदान कळण्यासाठी चिपळूणमधील प्रयोगशाळा मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यामुळे गुरांवर लसीकरण होत नाही, चिपळूण कार्यालयाची इमारत नादुरुस्त असून तेथे जाण्याकरीता रस्त्याची व्यवस्था नाही याकडे पशुविभागाने लक्ष द्यावे अशा मागण्या मनसेतर्फे केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com