आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘ठिय्या’
85575
आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘ठिय्या’
सिंधुदुर्गनगरीत आंदोलन; शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय सेवेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार शासन सेवेत सामावून घ्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय होऊन सव्वा वर्ष झाले तरी, या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतलेले नाही. शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून विलंब होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १९ ते २२ ऑगस्ट या चार दिवसांचे कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ७०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्या वतीने शासन आणि प्रशासनाला दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १० वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत १४ मार्च २०२४ ला शासन निर्णय झाला. या निर्णयाला आता सव्वा वर्ष उलटून गेले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय प्रलंबित असतानाच नव्याने पदभरती केली जात आहे. हा एक प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे. हे कर्मचारी अल्प मानधनात काम करत असून मासिक वेतनही वेळेत मिळत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
समायोजन आणि दरमहा वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १९ ते २२ ऑगस्ट या चार दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारून आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास १० वर्षे पूर्ण झालेले सुमारे २३८ अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम होण्याचा लाभ मिळणार आहे. तसेच संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठा सण असल्याने या कालावधीत आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी येथे केवळ चार दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. याची दखल शासनाने न घेतल्यास पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष पाताडे, सचिव अजित सावंत, राज्य समन्वयक कार्मिस आल्मेडा, जिल्हा लेखा व्यवस्थापक आत्माराम गावडे, संतोष खानविलकर, तिलोत्तमा मुननकर, केतन कदम, दया कांबळे, गणेश वेतोरेकर, लीना आल्मेडा आदी पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
......................
प्रमुख मागण्या...
* १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन
* दरमहा वेळेत वेतन
* कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनापर्यंत नवी पदभरती नको
* २०२४-२५ ची मासिक वेतनवाढ व लॉयल्टी बोनस द्यावा
* समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदली धोरणानुसार एनएचएम अधिकारी, कर्मचारी यांना बदली धोरण लागू करावे
* ईपीएफ योजना व गट विमा लागू करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.