रत्नागिरी- गोगटे महाविद्यालयात करिअर संसदेची स्थापना
गोगटे महाविद्यालयात करिअर संसद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करिअर संसदेची स्थापना करण्यात आली. संसदेचा शपथविधी केळकर सभागृहात झाला. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
संसदेत श्रुती गोगटे (मुख्यमंत्री), करिष्मा हसये (नियोजन मंत्री), रिद्धी नागवेकर (कायदे व शिस्तपालन मंत्री), सिद्धी साखळकर (सामान्य प्रशासनमंत्री), तन्वी जाधव (माहिती व प्रसारण मंत्री), आर्या पिलणकर (उद्योजकता विकास मंत्री), मधुरा मुळ्ये (रोजगार-स्वयंरोजगार मंत्री), श्रावणी मुळ्ये (कौशल्य विकास मंत्री), भूमिका चंदरकर (संसदीय कामकाज मंत्री), लावण्या पाटील (महिला व बालकल्याण मंत्री) आणि वेदिका कोळी (सदस्य) यांनी शपथ घेतली.
‘केंद्र, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय आणि विविध संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यासाठी करिअर संसदेने नेतृत्व करावे,’ अशी अपेक्षा डॉ. साखळकर यांनी व्यक्त केली. भेदभावविरहित, मानसिकदृष्ट्या स्वास्थ्यपूर्ण, निर्व्यसनी कर्तृत्ववान युवक घडवण्याचे आवाहन केले. या वेळी बीएमएस विभागप्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी मंचावर उपस्थित होत्या. प्रा. पंकज घाटे यांनी सूत्रसंचालन केले. कट्टा उपक्रम समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुहास नागले यांनी आभार मानले.