वेदांतातील तत्त्वे आजही अनुपालनयोग्य
-rat२१p१७.jpg-
२५N८६०३८
रत्नागिरी : संस्कृतदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रा. कश्मिरा दळी यांचा सत्कार करताना डॉ. कल्पना आठल्ये. सोबत अक्षया भागवत.
----
वेदांतातील तत्त्वे आजही अनुपालनयोग्य
प्रा. कश्मिरा दळी ः गोगटे महाविद्यालयात संस्कृत दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : प्रत्येक मनुष्य हा जीवनात आनंद मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. वेदांत दर्शन जरी प्राचीन असल्याचे वाटत असले आणि ते केवळ सेवानिवृत्ती किंवा वृद्धावस्थेत वाचायचे असते, असा जनमानसातील समज असला तरी प्रत्यक्षात वेदांत हा जीवनदृष्टी प्रदान करणारा असल्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. वेदांत जीवनदृष्टी प्रदान करते, वेदांतातील तत्त्वे आजही अनुपालनयोग्य आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातील प्रा. कश्मिरा दळी यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृतदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी दर्शनशास्त्रातील षड्दर्शनपैकी वेदांत दर्शनाचे स्थान स्पष्ट केले. जीव, जगत, ईश्वर, माया, मोक्ष आणि मोक्षसाधन कर्म इत्यादी मूलभूत संकल्पनांची तत्त्वज्ञानिक मांडणी केली. वेदांतातील प्रत्येक वेदाशी निगडित असलेल्या महावाक्यांचा थोडक्यात परिचय दिला. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ या वाक्याचे दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्टीकरणही केले.
कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत भारतीच्या अक्षया भागवत उपस्थित होते. डॉ. आठल्ये यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्कृतदिनाचे महत्त्व सांगून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
चौकट १
सांस्कृतिक कार्यक्रम रंगले
मुदाकरात्तमोदकम् हे स्तोत्रगायन वैभवी जोशी हिने केले. टीव्हीसी वार्ता विनाकारिणी नावाची छोटी नाटिका वरदा बोंडाळे, कनक भिडे, सायली ताडे, चिन्मयी सरपोतदार, आर्या मुळ्ये, ओंकार खांडेकर या विद्यार्थ्यांनी सादर केली. मधुराष्टकम् या स्तोत्रावर वेदश्री बापट हिने नृत्य सादर केले. हास्यविनोदपूर्ण ‘चर्पटपञ्जरी’ नावाचा संवाद मनस्वी नाटेकर, अक्षरा भट, मीरा काळे व कल्पजा जोगळेकर यांनी सादर केला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी मनसा सततं स्मरणीयं हे गीत सादर केले. संतोषी गिरी, साक्षी शेवडे, मधुश्री वझे, स्मितल बेंडे, स्नेहा कोकरे या विद्यार्थिनींनी मंगळागौर संवाद सादर केला.