मालवणात गणेशोत्सवात ''डीजे''वर बंदी
swt222.jpg
86329
मालवणः येथील तहसील कार्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीत बोलताना तहसीलदार वर्षा झालटे.
मालवणात गणेशोत्सवात ‘डीजे’वर बंदी
तहसिलदार वर्षा झालटेः नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : गणेशोत्सव काळात तालुक्यात डीजे लावण्यावर बंदी असणार आहे. नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार वर्षा झालटे यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत दिला.
तालुक्यातील गणेशोत्सव नियोजनाच्या दृष्टीने तहसील कार्यालयात तहसीलदार झालटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, सहाय्यक महसूल अधिकारी शिवराज चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सवाच्या दृष्टीने विविध गोष्टींवर तसेच भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. शहर तसेच तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. यावर तहसीलदार झालटे यांनी येत्या तीन दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेला दिले. रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवर लावलेले विविध राजकीय बॅनर व अन्य बॅनर काढण्यात यावेत, अशी सूचना मांडण्यात आली. शहरात ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा बनविण्यात आल्या आहेत, तेथे पार्किंगचे व्यवस्थित मार्किंग करून घ्यावे. गणेशोत्सव काळात एसटी प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडाव्यात. मालवण बाजारपेठेत एसटी बस व मोठ्या गाड्यांना बंदी असणार आहे. तसेच बाजारपेठेत दुचाकी वाहतुकीस परवानगी द्यावी की न द्यावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले.
गणेश मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी. धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, अशा सूचना तहसीलदारांनी केल्या. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. शहरातील वीज व स्ट्रीट लाईटबाबत काही समस्या असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात दुर्घटना घडल्यास पालिकेने अग्निशमन बंब तत्पर ठेवावा. नगरपालिकेने मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, असेही तहसीलदारांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार असल्याने मालवण एसटी स्टॅन्ड येथे आरोग्य सेवेसाठी बूथ लावण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कोट
गणेशोत्सव काळात तालुक्यात सर्वत्र सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. उत्सवाच्या काळात नागरिकांनी व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. गणेशोत्सव शांततेत आणि विनासायास संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग, पोलीस यंत्रणा, व्यापारी, नागरिक व मंडळे यांनी सहकार्य करावे
- वर्षा झालटे, तहसीलदार, मालवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.