-गणपती बाप्पा दिसणार फेटा आणि धोतीत
- rat२२p२.jpg & rat२२p३.jpg -
२५N८६२५७, २५N८६२५६
फेटे बांधलेले बाप्पा.
----
येई गणेशा.........लोगो
गणपती बाप्पा यंदा दिसणार फेटा अन् धोतीत...!
मूर्तिकार अविराज कानसरे ; मूर्तीला खऱ्या वस्त्रांचा साज
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः आपल्या गणेशमूर्ती चित्रशाळेतील मूर्ती अधिकाधिक आकर्षक आणि देखण्या असाव्यात यासाठी मूर्तिकार प्रयत्न करत असतो. कोणी गणेशमूर्तीला विविध रंगांचे खडे लावतो तर कोणी रंगीत झीग लावून सजावट करतो. कसबा येथील तरुण मूर्तिकार अविराज कानसरे याने आपल्या गणेशमूर्ती चित्रशाळेत मूर्ती फेटा आणि धोतीमध्ये दाखवून भक्तगणांची आगळीवेगळी मागणी पूर्ण केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील गणेश चित्रशाळांतून मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवा मूर्तिकार अविराज कानसरे यांच्या कारखान्यातही बाप्पांना सजवण्याचे काम सुरू आहे. बाप्पांना कापडी फेटा व धोती नेसवून नवा साज चढवला जात आहे. या नव्या रूपात, ढंगात बाप्पांचे अनोखे रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
कानसरे यांच्या कारखान्यात पीओपी आणि शाडूमातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. मातीपासून बनवलेल्या मूर्तींना जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर मागणी असते. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवा मूर्तिकार कानसरे हे वयाच्या दहाव्या वर्षी वडील आणि काकांबरोबर घरच्या मूर्तिशाळेत काम करू लागले आणि आता ते ही कला जोपासत आहेत. कानसरे यांच्या अविराज कलाकेंद्र हे सुबक मूर्ती नेत्रदीपक रंगकामामुळे गणेशभक्तांच्या पसंतीस उतरत आहेत .
मागील दोन वर्षांपूर्वी चित्रशाळेत कामाची लगबग सुरू असताना ते मुंबईला गेले असता तिथे एका कारखान्यात मूर्तिकार बाप्पाला कापडी धोतर, फेटा आणि शेला नेसवून सजवण्याचे काम करत असताना दिसले. त्यांच्या मनात विचार आला की, आपणही आपल्या कारखान्यात प्रयोग करून पाहिला पाहिजे. त्यांनी तशीच एक मूर्ती मुंबईहून गावी घेऊन आले आणि रंगकाम करून त्या मूर्तीला खऱ्याखुऱ्या वस्त्रांचा साज चढविला. ही मूर्ती तयार झाल्यावर त्यांच्या मित्राने मूर्ती पाहून अशीच मूर्ती पाहिजे, असा आग्रह केला होता.
खऱ्या कपड्यांच्या पेहरावातील गणेशमूर्तीसाठी कानसरे यांच्या नावाची प्रसिद्धी आजूबाजूच्या परिसरात आहे. मूर्तीला खरी वस्त्रे चढवताना रंगसंगतीचा विशेष विचार करावा लागत असल्याचे कानसरे सांगतात. आधी संपूर्ण मूर्तीला रंगकाम करून झाल्यावर त्या मूर्तीला कोणत्या रंगाचे धोतर, शेला, फेटा चांगला दिसेल याचा विचार करून त्याप्रमाणे बाजारातून कापड आणले जाते. कापडाला आधी सोनेरी काठ शिवले जाते आणि मग तयार झालेले वस्त्र मूर्तीवर चिकटवले जाते. बैठकीसाठी खरे कापड वापरले जाते. एक मूर्ती खऱ्या वस्त्रांत साकारण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. यंदा अशा २५ मूर्ती कानसरे यांच्या कारखान्यात तयार केल्या जात आहेत.
कोट
मी गेली पंधरा वर्षे कानसरे यांच्या मूर्तिशाळेतून गणपती बाप्पा आणतोय. त्यांची रंगसंगती आणि रेखणी खूप छान असते. आपल्याला पाहिजे तशी ते मूर्ती देतात. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र आहे.
- स्वप्नील पाटेकर, गणेशभक्त
कोट
मी वयाच्या दहाव्या वर्षापासून वडील आणि काकांबरोबर मूर्ती तयार करण्याचे बाळकडू घेत आहे. अजूनही मला माझे वडील, काका, भाऊ यांची मदत असतेच तसेच काही मित्रही आहेत, ते सुद्धा मला मदतीला येतात.
- अविराज कानसरे, मूर्तिकार कसबा