गणेशोत्सव शांततेत साजरा करा

गणेशोत्सव शांततेत साजरा करा

Published on

86331

गणेशोत्सव शांततेत साजरा करा
अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटमः सावंतवाडीतील गणेशोत्सव बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः गणेशोत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी येथे केले. लेझर लाईटला बंदी असून डीजे नियमानुसार वाजविले पाहिजेत. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक साटम बोलत होत्या. त्यांच्यासोबत पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खदंकर, निलेश गावित, सुधीर पराडकर, गोविंद गवंडे, मधुकर मातोंडकर, गोविंद वाडकर, अॅड. नुकुल पार्सेकर, सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, उमेश सावंत, जगदीश मांजरेकर, धर्मेंद्र सावंत, गजानन गद्रे, गजानन नाटेकर, ऑगोस्तीन फर्नांडिस, पुंडलिक दळवी, नीलम पावरा, मनवेल डिसोजा, विशाल सावंत, शैलेश मेस्त्री, संजय बागवे, किरण सावंत, शामसुंदर नाईक, बाळासाहेब बोर्डेकर, बाळा नार्वेकर, दुर्वेश रांगणेकर, अॅड. संदेश नेवगी उपस्थित होते.
बैठकीत नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम, वीज वितरण, एसटी बस, आरोग्य, वाहतूक व पार्किंग आणि शहरात भरणाऱ्या बाजाराबाबत चर्चा करण्यात आली. या शांतता समितीच्या बैठकीतील मुद्दे सर्व प्रशासकीय यंत्रणेला कळविले जातील तसेच भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी केले.
श्री. गावित यांनी सावंतवाडी एसटी डेपोमध्ये जादा ६० ते ७० बसेस येणार आहेत. त्यांची पार्किंग व्यवस्था केली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची सोय करण्यासाठी एसटी विभागाने जादा फेऱ्यांची सोय करावी, रेल्वेस्थानक ते बांदा अशी बस सोडावी. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी खबरदारी एसटी महामंडळाने घ्यावी, अशी मागणी बैठकीत सदस्यांनी केली. रिक्षा भाडे दरपत्रक व हेल्पलाईन नंबर देता येईल का? याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी विचारले असता रिक्षा युनियनचे पराडकर यांनी वस्तुस्थिती सांगितली. तसेच रिक्षा भाडे नाकारणाऱ्यांवर कारवाई केली तरी हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्था केली पाहिजे, तसेच रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी नियोजन करण्याची मागणीही त्यांनी केली. श्री. मातोंडकर यांनी रेल्वे येण्याची वेळ आणि गाड्यांची संख्या सांगितली. तेव्हा सदस्यांनी रेल्वे व एसटी विभागाने समन्वय साधून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी सूचना केली. शहरातील गणेशोत्सव मंडळ, मोती तलाव परिसरातील विद्युत रोषणाई आदी बाबींचा साटम यांनी आढावा घेतला. सदस्यांनी तालुका व शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून खड्डे बुजविण्याची मागणी केली. तसेच वीज वितरणाच्या अडचणींवर नाराजी व्यक्त केली. सहाय्यक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली, मात्र सदस्य समाधान झाले नाही, असे नमूद करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागू नयेत, यासाठी नगरपरिषदने नियोजन करावे, पोलिस सहकार्य करतील, असे निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य पथके एसटी बसस्थानक व रेल्वे स्थानकावर ठेवण्यात येतील, असेही स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गावरून झाराप झिरो पॉईंटमार्गे खासगी बसेस सावंतवाडी शहरात प्रवाशांना आणतील, अशी दक्षता पोलिस व आरटीओ विभाग घेतील. व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्या रात्री १० ते सकाळी ६ दरम्यानच बाजारात येतील, असे नियोजन केले जाईल, असे निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

चौकट
होर्डिंग्जबाबत काळजी घ्या
सावंतवाडी शहरातील होर्डिंग्ज कधीही पडून अपघात होऊ शकतात, विनापरवाना होर्डिंग्ज लावले जात असल्याचे लक्ष वेधले असता नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे यांनी परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावले जातात असे सांगितले. मात्र सदस्यांनी अपघात होणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. तसेच ठरवून दिलेल्या जागेत फलक लावले जावेत, असे मत नोंदविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com