''नरेंद्र''वरील जुगार अड्डा आता तरी बंद होणार का0
86378
86377
‘नरेंद्र’वरील जुगार अड्डा
आता तरी बंद होणार का?
पालकमंत्र्यांच्या ‘अॅक्शन’नंतर प्रश्नः बेकायदेशीर झोपडीत सुरु आहे अनेक वर्षे जुगार
रुपेश हिरापः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे मटका बुकीवर स्वतः धाड टाकून पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे पाडल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर अनेक वर्षांपासून बेकायदेशीर झोपडी बांधून सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी खुलेआम सुरु असलेला हा जुगार अड्डा पोलिस प्रशासन इतकी वर्षे का बंद करू शकले नाहीत, हा प्रश्न उपस्थित होत असून पालकमंत्र्यांच्या ‘अॅक्शन’नंतर आतातरी हा अड्डा उद्ध्वस्त होणार का? अशी अपेक्षा नरेंद्र डोंगरप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
शहराचे हृदय म्हणून ओळख असलेला नयनरम्य नरेंद्र डोंगर हिरवाईने नटलेला असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो अवैध धंद्यांमुळे बदनाम होत चालला आहे. दारू पार्ट्या, जुगार आदींचे खुलेआम आयोजन येथे होते; मात्र पोलिस यंत्रणा तेथे कधीच पोहोचत नाही. विशेष म्हणजे, या डोंगराच्या पायथ्याशी नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी, चारही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या परिसरात दररोज रात्री झुगार अड्डा सुरू असतो. या अड्ड्यासाठी बेकायदेशीर झोपडीही उभारली असून त्याठिकाणी अनैतिक प्रकारही होत असल्याची चर्चा आहे. गुटख्याच्या छोट्या गाड्यांवर कारवाई करणारे पोलिस एवढ्या मोठ्या जुगार अड्ड्याकडे दुर्लक्ष का करतात, हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील किरकोळ बाबींची माहिती असणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागालाही याचा मागमूस कसा लागत नाही, हे कोडेच आहे. आता तरी पालकमंत्री राणे यांनी दाखवलेल्या भूमिकेनंतर सिंधुदुर्ग पोलिस यंत्रणा नरेंद्र डोंगर पायथ्याशी चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्याचा पर्दाफाश करणार का, अशी विचारणा नागरिक व डोंगरप्रेमी करत आहेत. या परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा होत असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. तरीसुद्धा संबंधितांकडून अड्डा बिनधास्त सुरू ठेवण्यात येतो. सावंतवाडीच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी यापूर्वी कारवाईचा प्रयत्न केला होता; मात्र झोपडीकडे जाणारा अडचणीचा व दरीसारखा भाग असल्याने पोलिस अडकण्याचा धोका असल्यामुळे कारवाई अर्धवट राहिली. तरीही एवढी मोठी जोखीम घेऊन हा जुगार अड्डा आजही सुरू आहे.
खेळण्यासाठी येणाऱ्यांची खाणेपिण्याची सोय झोपडीत केली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येथे जमतात. रात्री लाखो रुपयांची उलाढाल होते. मग पोलिस हा अड्डा मुळासकट उखडून टाकणार का? अवैध झोपडी कायमची पाडून पुन्हा सुरू होऊ नये याची काळजी घेणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक व डोंगरप्रेमींनी केला आहे.
चौकट
कर्तव्याचा विसर की दबावाचा खेळ?
संबंधित जागा पालिकेची, वन विभागाची की खासगी, हा प्रश्न कायम आहे. पण, अडगळीच्या भागात ही झोपडी उभारलीच कशी आणि पोलिसांनी त्याकडे कधीच लक्ष का दिले नाही, हा संशोधनाचा भाग आहे. जुगार अड्ड्यापर्यंत पोहोचण्यासाठीच्या मार्गावर गुप्त देखरेख यंत्रणा बसवली असल्याने संशयास्पद हालचाल किंवा पोलिसांची चाहूल लागली की अड्डा चालवणाऱ्यांना लगेच अलर्ट मिळतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आजवर कोणतीही कारवाई होऊ शकली नाही, असे बोलले जाते. मग खरोखरच सावंतवाडीच नव्हे तर जिल्ह्याची पोलिस यंत्रणाच एवढी कमकुवत आहे का? की पोलिसांनी कर्तव्यच विसरले आहे किंवा त्यांना तसे करण्यास भाग पाडले जातेय, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
चौकट
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
पालकमंत्री राणे यांनी स्वतःच्याच मतदारसंघातील कणकवली येथे मटका बुकीवर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घातल्यास ते उध्वस्त होऊ शकतात, हे यातून दिसून आले आहे. त्यामुळे सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावरील अवैध जुगार अड्डा कायमचा बंद करण्यासाठी स्वतः राणे यांनी हस्तक्षेप करून संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
कोट
‘‘नरेंद्र डोंगरावर जर जुगारासारखे खेळ सुरू असतील किंवा त्यासाठी बेकायदेशीर झोपडी उभारली गेली असेल, तर ती उद्ध्वस्त करण्यासोबत असा प्रकार पुन्हा सुरू होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच रात्रीच्या वेळी त्या भागात गस्तही सुरु केली जाईल.’’
- अमोल चव्हाण, पोलीस निरीक्षक, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.