चाकरमान्यांच्या आगमनावर ''आरोग्य''ची नजर
चाकरमान्यांच्या आगमनावर ‘आरोग्य’ची नजर
१६ ठिकाणी पथके तैनातः साथरोग पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्ककता
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २२ः गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून साथरोगांचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि चेकपोस्ट अशा १६ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये कामानिमित्त मोठ्या संख्येने राहणारे सिंधुदुर्गातील नागरिक दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी परततात. मात्र, या शहरी भागांतील साथरोग त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून ही पथके कार्यरत राहणार आहेत. कणकवली, सावंतवाडी रोड, वैभववाडी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग ही प्रमुख रेल्वे स्थानके, तसेच मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ ही एसटी स्थानके आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, दोडामार्ग, करूळ अशा चेकपोस्टवर सकाळी ८ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री ८ अशा दोन सत्रांत वैद्यकीय पथके तैनात राहतील. रेल्वे स्थानकांवरील पथके गाड्यांच्या वेळेनुसार कार्यरत असतील.
चौकट
घरोघरी सर्वेक्षण
आरोग्य पथकांच्या तपासणीशिवाय थेट गावी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांमुळेही धोका संभवतो. त्यामुळे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन साथरोग सर्वेक्षण करणार आहेत. तापासारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉ. धुरी यांनी केले आहे.
कोट
“गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आमच्यासाठी प्राधान्य आहे. वेळेवर तपासणी आणि घरोघरी सर्वेक्षण करून साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी