झोळंबे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गवस यांची फेरनिवड
86539
झोळंबे तंटामुक्त गाव समितीच्या
अध्यक्षपदी गवस यांची फेरनिवड
१८ वर्षे कामः निःस्वार्थी सेवेची पोच पावती
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. २३ः गाव तेथे छोटे-मोठे वाद होतच असतात. कोकणात तर गावागावांत ही अवस्था असते. ते मिटवून गावचा एकोपा टिकवण्याचे काम सोपे नसते. झोळंबे येथे तब्बल १८ वर्षे तंटामुक्ती जपणारे सुखाजी गवस यांची पुन्हा एकदा या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी केलेल्या निःस्वार्थी कामाची ही पोच पावती म्हणावी लागेल.
झोळंबे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले देखणे गाव. बागबागायतीसह अध्यात्माचा समृद्ध वारसा या गावाला लाभला आहे. अलीकडच्या काळात तंटामुक्तीच्या प्रभावी कामासाठीही या गावाने दोडामार्ग तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सगळ्यामध्ये सुखाजी गवस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. माजी सैनिक असलेल्या गवस यांनी निवृत्तीनंतर गोव्याच्या पोलिस खात्यात सेवा बजावली. तेथून निवृत्तीनंतर ते झोळंबेमध्ये पूर्णवेळ स्थायिक झाले. निवृत्तीचे आयुष्य आपण आणि आपले कुटुंब इतक्यापुरते मर्यादित न ठेवता ते सामाजिक कामातही सक्रिय झाले.
पाच वर्षे गावचे उपसरपंचपद सांभाळण्यासह तेथील माध्यमिक विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य, तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, माऊली मंदिर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी अशा विविध क्षेत्रांत त्यांनी सक्रिय काम केले. दोडामार्ग सैनिक पतसंस्थेचे ते संचालकही आहेत. या सगळ्या वाटचालीमुळे त्यांनी सामाजिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. यातूनच तंटामुक्त गाव समितीचे काम अधिक बहरत गेले. तब्बल १८ वर्षे या समितीचे अध्यक्षपद सांभाळणे सोपे नसते. ते त्यांनी आपल्या निःस्वार्थी कामातून करून दाखवले. या समितीची निवड प्रक्रिया झाली. या समितीवर गवस यांची फेरनिवड करण्यात आली.