अतिवृष्टीचा सेंद्रीय भाजीपाला उत्पादनावर घाला

अतिवृष्टीचा सेंद्रीय भाजीपाला उत्पादनावर घाला

Published on

-rat२३p१५.jpg -
२५N८६५५३
दापोली ः कादिवली भागातील अतिवृष्टीमुळे भाजीपाला शेतीचे झालेले नुकसान.
-------
अतिवृष्टीचा सेंद्रिय भाजीपाला उत्पादनावर घाला
गणेशोत्सवाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका; पंचनाम्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २३ ः तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सेंद्रिय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग चार दिवसांच्या अतिवृष्टीमुळे वेळवी, कुडावळे आणि कादिवली या गावांतील सेंद्रिय शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकरी हताश झाले आहेत.
१५ ते २० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावरच पिके नष्ट झाली. या भागात शंभर टक्के सेंद्रिय भाजीपाला उत्पादन केले जात असल्याने दापोलीकरांसाठी हा भाग महत्त्वाचा ठरला होता. कुडावळे येथील सेंद्रिय शेती तज्ज्ञ विनायक महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे स्थानिक युवकांनी मुंबई गाठण्याऐवजी गावातच थांबून शेती व्यवसायाला हात घातला होता. ‘ग्रामोदय फार्मर्स प्रॉड्युसर कंपनी’च्या माध्यमातून या भागातील अनेक युवकांनी चांगल्या पद्धतीने सेंद्रिय भाजीपाला उत्पादन सुरू केले होते.
कुडावळे येथील शेतकरी एकनाथ मोरे यांनी सांगितले, या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या अगदी तोंडावर पीक तयार झाले होते; परंतु मुसळधार पावसामुळे सेंद्रिय शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दररोज वेळवी, कुडावळे व कादिवली या भागातून चिबूड, पडवळ, काकडी, कारली, दुधी भोपळा, माठ आदी पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर दापोली बाजारात विक्रीसाठी आणल्या जात होत्या; मात्र यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न कोलमडले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी विभागाचे कृषी साहाय्यक अधिकारी मर्चंडे यांनी करून पंचनामा केला. त्यांच्या अहवालानुसार एकूण १७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चौकट
गणेशोत्सवात दीड लाखांची विक्री
गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे दीड लाख रुपयांची भाजीपाल्याची विक्री या भागातून होत असे; मात्र यंदा या शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न बुडाले असून, शासनाने तातडीने जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वेळवी, कुडावळे व कादिवली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट
गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळवी, कुडावळे, कादिवली भागातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचे पंचनामे आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केले आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेला आहे. अधिकाऱ्यांशी बोलणेदेखील झाले आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
-हेमंत ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com