युवा तायक्वांदो खेळाडूंना पदक, ब्लॅक बेल्ट वितरण

युवा तायक्वांदो खेळाडूंना पदक, ब्लॅक बेल्ट वितरण

Published on

युवा तायक्वांदो खेळाडूंना बेल्ट वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर संलग्न रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, नेहरू युवाकेंद्र, तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक आणि ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आले. जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक देण्यात आली. नाचणे येथील श्री साईसेवा मित्रमंडळात कार्यक्रम झाला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत, बँक ऑफ बडोदाचे अधिकारी प्रशांत जाधव, आरडीसीसी बँकेचे अधिकारी तुषार साळुंखे, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सावंत, सीमा धुळप उपस्थित होते. प्रशिक्षक राम कररा, अमित जाधव, शशीरेखा कररा, अथर्व भागवत, गुरूप्रसाद सावंत, प्रतीक पवार, तन्वी साळुंखे यांनी सर्व स्वागत केले.
चिपळूणच्या स्वामी मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरने ६६ पदके संपादन करत पुमसे प्रकारात प्रथम क्रमांकाचा चषक तर फ्रीस्टाइल पुमसे प्रकारातही प्रथम क्रमांक चषक पटकावला. या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी जागतिक तायक्वांदो असोसिएशन आयोजित ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आले.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे येथे झालेल्या सीबीएससी विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत उत्तर प्रदेशात सहभागी होणाऱ्या दुर्वा पाटील आणि प्रशिक्षिका शशीरेखा कररा यांनाही सन्मानित केले. सूत्रसंचालन तन्वी साळुंखे यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com