गणेशोत्सव खरेदीवर महागाईचे सावट
swt259.jpg
86967
सावंतवाडी ः येथील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गणेशोत्सव खरेदीवर महागाईचे सावट
साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; पावसाच्या विश्रांतीने दुकानदार, ग्राहकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणरायाच्या सज्जतेसाठी तसेच यानिमित्त लागणारे साहित्य खरेदी-विक्री वेगाने सुरू आहे. आज पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने दुकानदार आणि ग्राहक यांना दिलासा मिळाला; परंतु सर्वच वस्तूंचे दर वधारल्याने त्याची मोठी झळ खरेदीसाठी गेलेल्या गणेश भक्तांच्या खिशाला बसली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील सगळ्याच प्रमुख बाजारपेठांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली.
कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार (ता.२७) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त चाकरमानी आपल्या गावी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. गणरायाच्या मूर्तीची स्थापना करायला एकच दिवस शिल्लक राहिल्याने आज खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते. यामुळे बाजारपेठा अक्षरशः फुलल्या होत्या. गणपती सजावट, गणपतीची मंडपी सजावट, तसेच गणेशोत्सव कालावधीत जेवणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.
गणेशोत्सव खरेदीसाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत. मंडपीसाठी लागणारा फुलोरा आजपासूनच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र, शरवड, कांगल, कवंडळ, हरणा, तिरडे या साहित्याचे दर वधारले दिसून आले. ५० रुपये वाटा किंवा एक जुडी विक्रीसाठी लावण्यात आली होती. कवंडळ ५० रुपयांना पाच ते सहा देण्यात येत होती. परंतु, शरवड, कांगल यांचे चार ते पाच फांद्या ५० रुपयाने विक्रीसाठी लावण्यात आल्याने गणेशभक्त नाराज दिसले. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहराप्रमाणे दर लावण्यात आल्याचे हे गणेश भक्त बोलत होते. याशिवाय गणेश सजावटीचे साहित्य नावीन्यपूर्ण रूपाने विक्रीसाठी उपलब्ध होते. थर्माकॉलपासून बनविलेले रेडिमेड साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. चाकरमानी आदी दोन दिवस घरी आल्याने मिळणाऱ्या अल्प कालावधीत गणपतीचे डेकोरेशन करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे रेडिमेड डेकोरेशन खरेदी करण्यावर भर दिसला. त्याच बरोबर अलीकडे प्लास्टिक स्वरूपात झेंडूची फुले आकर्षक प्रकारात उपलब्ध होतात. त्यांचा वापर केल्यावर गणेशमूर्ती परिसरात चांगलाच आकर्षकपणा येतो. त्यामुळे ही प्लास्टिक फुले खरेदीवर सुद्धा भर दिसला. या शिवाय फटाके खरेदीसाठीही जोर होता. पाऊस नसल्याने फटाके खरेदी करून नेण्यासाठी लगबग दिसून आली. गणपती समोर ठेवण्यासाठी सफरचंद, डाळिंब, पेरू याचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. सफरचंदाचे २००च्या पार किलोचे गेलेले दर खरेदीदारांच्या खिशाला कात्री लावून गेले. एकंदरीत आजपासून गणेशोत्सव साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. पूर्व खरेदीसाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांत मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री झाली आहे. अजून उद्याचा दिवस असल्याने यात अजून वाढ होणार आहे. आज खरेदीसाठी बाहेर न पडलेले नागरिक उद्या खरेदीसाठी बाहेर पडणार आहेत.
चौकट
घरे झाली रंगीबेरंगी
जिल्ह्यातील अनेक घरे बंद असतात. या घरांतील नागरिक कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरांत राहतात. हे नागरिक आता दाखल झाले आहेत. त्यांना घराला रंग काढण्यापासून सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे रंग खरेदीसाठीसुद्धा गर्दी झालेली दिसली. पूर्वी व्हाईट रंग आणि आपल्याला कोणता रंग पाहिजे, त्याची बॉटल खरेदी करावी लागत होती. घरी नेऊन तो रंग तयार करून मारावा लागत होता. परंतु, अलीकडे उत्तम दर्जाचे आपल्याला हवा त्या प्रकारचा रंग आपल्या समोर तयार करून दिला जातो. तो रंग घरी नेऊन भिंतीना मारला की काम होते. यामुळे चांगल्या प्रकारची रंगाची शेड मिळते. त्यामुळे ग्राहकांचा तयार करून रंग घेण्यावर भर दिसला.
कोट
डेकोरेशन साहित्य किंवा रेडिमेड डेकोरेशन मुंबई येथे विविध प्रकारचे आणि कमी दरात मिळते. परंतु, हे साहित्य तेथे खरेदी करून गावी आणताना खराब होण्याची शक्यता जास्त असते. येताना ट्रेनमध्ये गर्दी असते किंवा कन्फर्म तिकीट असली, तरी एवढा लांबचा प्रवास असल्याने ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही गावी येऊन हे साहित्य खरेदी करतो.
- प्रमोद नारकर, चाकरमानी
कोट
गेले अनेक दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गणेश चतुर्थी पूर्वी पाऊस असाचा राहिला, तर बाजारपेठा अपेक्षित भरणार नाहीत, ही भीती होती. त्यामुळे दुकानात लागणारे साहित्य मागविताना थोडासा विचार करावा लागला. परंतु, सुदैवाने पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आजपासून ग्राहकांनी बाजारपेठा गजबजजू लागल्या आहेत. ही आम्हा दुकानदाराने जमेची बाजू आहे.
- प्रसन्न तेली, दुकानदार, कुडाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.