खडपोली एमआयडीसीतील वाहतूक ठप्प

खडपोली एमआयडीसीतील वाहतूक ठप्प

Published on

-rat२५p७.jpg-
२५N८६९२८
चिपळूण ः पिंपळीफाटा येथे खडपोलीकडे जाणारी वाहतूक बंद करण्याचे फलक लावण्यात आले आहे.
----
दसपटी विभागातील वाहतूक ठप्प
पूल खचल्याने १५ गावांची गैरसोय; हलक्या वाहनांसाठी दोन पर्यायी रस्ते, चाकरमान्यांचा प्रवास खडतर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : खडपोली येथील स्थानिक नदीवरील पूल शनिवारी (ता. २३) रात्री अचानक खचल्यानंतर दसपटी विभागात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांना पेढांबेमार्गे खडपोलीला जावे लागत आहे तसेच कळंबस्ते-मोरवणे, दळवटीमार्गे दसपटीत यावे लागत आहे. हे दोन्ही रस्ते छोट्या वाहनांसाठी चांगले आहेत; मात्र औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गणेशोत्सव काळात या पुलावरील वाहतूक बंद झाल्यामुळे चाकरमान्यांचाही प्रवास लांबला आहे.
पिंपळी-नांदिवसे मार्गावर खडपोली येथील स्थानिक नदीवर सुमारे साठ वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. चिपळूणमध्ये आलेले सर्व महापूर या पुलाने पाहिले आहेत. पिंपळीहून नांदिवसेकडे जाताना पुलाच्या उजव्या बाजूने पाहिल्यावर पाण्याचे दोन प्रवास येतात. सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणी याच पुलाखालून जाते. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा गाळ साचलेला आहे. एका बाजूचा गाळ जलसंपदा विभागाने काढला; मात्र दुसऱ्या बाजूला गाळ तसाच आहे. त्याचे चक्क बेट तयार झाले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी स्थानिक लोक वीट बनवण्याचा व्यवसाय करतात. शनिवारी (ता. २३) सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. या पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या पिलरला तडे गेले. त्यानंतर हा पूल खचल्याचे नागरिक सांगतात. कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलचा या पुलाशी काहीही संबंध नाही. कारण, याच मार्गावर कोयना अवजल वाहून नेणारा कालवा आहे. त्या कालव्यावर दुसरा लहान पूल आहे तोही जीर्ण झाला आहे. या दोन्ही पुलावरून खडपोली एमआयडीसी आणि स्थानिक गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जाते. दोन्ही पूल अरुंद आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केली होती.

चौकट
चाकरमान्यांसाठी मोरवणे मार्ग
मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना बहादूरशेख नाका येथे येऊन नंतर पिंपळीमार्गे पुढे दसपटीत जावे लागते. आता बहादूरशेख नाक्यावर न येता कळंबस्तेमार्गे मोरवणे-दळवटणे येथून दसपटीत जावे लागणार आहे. हलक्या वाहनांसाठी हा मार्ग शासनाच्या पीएमजेएसवाय योजनेतून दुरुस्त करण्यात आला आहे.

चौकट
चिपळूणमधील स्थानिकांना दसपटीत जाण्यासाठी पेढांबेमार्गे खडपोली मार्गाचा वापर करावा लागणार आहे. हा मार्ग रूंद आणि वळणाचा आहे. या मार्गावरून प्रवास करताना स्थानिकांचा प्रवास ३.४ किमीने वाढला आहे. या मार्गावरूनच एसटी बसेस वळवण्यात आल्या आहेत. या मार्गावर खडपोली, गाणे, आकले, वालोपे, नांदिवसे, ओवली, कादवड, तिवडी, तिवरे, रिक्टोली आदी १५ गावे येतात. या गावात जाण्यासाठी एसटी बसेस पेढांबेमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

कोट
खडपोली एमआयडीसीतून दिवसा २५ मालवाहतुकीची वाहने ये-जा करतात. स्थानिक नदीवरील पूल खचल्यानंतर औद्योगिक क्षेत्राची वाहतूक थांबली आहे. शासनाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करू.
--सुयोग चव्हाण, व्यवस्थापक, कृष्णा अॅन्टिऑक्साईड, खडपोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com