सुविधाच नाहीत मग कर वसूली का0
swt2519.jpg
87079
देवगड नगरपंचायत
सुविधाच नाहीत मग कर वसुली का?
देवगड नगरसेवक : गणेशोत्सव आला तरी कामे अपूर्ण राहिल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ : शहरातील नागरिकांना पथदीप आदी आवश्यक सुविधा सक्षमपणे पुरविल्या जात नसल्यास नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांकडून दिवाबत्ती कर इतकेच काय स्वच्छता आणि आरोग्य करही घेऊ नये, असे नगरसेवकांनी आजच्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सांगितले. गणेशोत्सव तोंडावर आला तरी शहरातील काही भागांतील पथदीप तसेच हायमास्ट मनोरे बंद आहेत. रस्त्याकडेचे रान कापलेले नाही. याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधून नाराजी व्यक्त केली.
येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात झाली. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, नगरसेवक शरद ठुकरूल, प्रणाली माने आदी उपस्थित होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही बंद पथदीप सुरू करण्यात आलेले नाहीत. काही भागांतील हायमास्ट मनोरेही बंद अवस्थेत आहेत. काही भागांतील रस्त्याकडेचे गवत कापलेले नाही, आदी विविध मुद्दे नगरसेवकांनी उपस्थित करून प्रशासनाला प्रश्न विचारले.
प्रशासनाने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, कसल्याहीप्र कारचे बोटचेपे धोरण नको. यामुळे नगरसेवकांना जनतेला उत्तरे द्यावी लागतात, असे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी सांगून नाराजीचा सूर आळवला. हाच धागा पकडून नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी, बंद हायमास्ट वेळीच चालू होत नसतील, बंद पथदीप सुरू होत नसतील तर पथदीप कर कशाला घेता? असा प्रश्न उपस्थित करून गेली सुमारे तीन वर्षे सातत्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावरून त्यांनीही नाराजी व्यक्त करून नगरपंचायत प्रशासन शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवू शकत नसल्यास दिवाबत्ती कर घेऊ नये, असे सुचविले. तर श्री. बांदेकर यांनी त्यात भर घालून सोबत स्वच्छता आणि आरोग्य कर देखील घेऊ नये, असे सांगितल्यावर त्यालाही चांदोस्कर यांनी दुजोरा दिला. बँकांमधील खात्यांमार्फत नगरपंचायतीची मोठी उलाढाल होत असताना बँकांच्या सीएसआर फंडातून संगणक आदी साहित्य घेण्याऐवजी पथदीप घेण्यात यावेत, असे नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी यांनी सुचविले. बँकांकडून आवश्यक सहकार्य होत नसल्यास खाती अन्य बँकांमध्ये वळवा, असेही त्यांनी सुचविले. नळयोजना दुरुस्ती कामाचा विषय नगरसेवक श्री. बांदेकर यांनी उपस्थित करून त्यासाठी लागणारी १० टक्के लोक वर्गणीची रक्कम नगरपंचायत कशी भरणार? अशी प्रशासनास विचारणा केली. ही बाब प्रशासनाने सभागृहात का निदर्शनास आणून दिली नाही? असेही विचारले.
याबाबत पालकमंत्र्यांमार्फत शासनाला कळवून कामासाठीचा शंभर टक्के निधी देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वच्छतेसंदर्भातील क्यूआरकोड वर्ष होत आले तरी सर्वच घरांना लावले गेलेले नाहीत. तसेच लावलेले कोड कार्यान्वित आहेत का? अशी विचारणा श्री. बांदेकर यांनी केली. याबाबत जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत संबंधितांची बिले न देण्याची मागणी करण्यात आली. नगरपंचायतीच्या एका खुल्या क्षेत्राची विभागणी करण्याचे कारण काय? अशी विचारणा करण्यात आली. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. चालू आर्थिक वर्षाकरिता नगरपंचायतीला आवश्यक साहित्य, सेवा पुरवठा करण्याच्या विषयावर कोणत्या वस्तूंची खरेदी केली जाणार, त्याची यादी सभागृहासमोर ठेवणे आवश्यक आहे. नुसते मोघम ठराव नको, असे श्री. बांदेकर यांनी सांगितले. यावेळी कांदळवन सहव्यवस्थापन समिती गठीत करण्याबाबत चर्चा करून समितीची रचना कशी असेल, याची माहिती देण्यात आली. एकूण सात सदस्यीय समितीमध्ये एक वनविभागाचा प्रतिनिधी, तर उर्वरित सहामध्ये तीन महिलांचा समावेश असावा, असे सांगण्यात आले.
चौकट
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव मानधनविना
गणेशोत्सव तोंडावर आला तरी कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मानधन मिळालेले नाही. मागील सुमारे दोन महिन्यांचे मानधन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. यावरून बरीच चर्चा झाली. संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी विंधन विहिरीवरील लघू नळ योजनेचे पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मानधन मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.