पावसाने उडवली गणेशभक्तांची तारांबळ

पावसाने उडवली गणेशभक्तांची तारांबळ

Published on

87246
87247
87248
87249

पावसाने केला गणेशभक्तांचा उत्साह ‘ओला’
पूर्वसंध्येलाचा झोडः अनेकांवर खरेदी अर्धवट ठेवून परतण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २६ ः चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज जिल्ह्यात पुन्हा पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. अनेक भागांत मुसळधार सरींमुळे बाजारपेठांमध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आगामी उत्सवावर पावसाचे सावट असल्याने गणेशभक्तांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात १६ ते २१ ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस झाला होता. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने पुरस्थिती निर्माण होऊन घरे, गोठे व इतर मालमत्ता कोसळल्याने तब्बल २६ लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती. गेले दोन–तीन दिवस जिल्ह्यात कडक ऊन पडत होते. मात्र, सोमवारी (ता.२५) सायंकाळपासून वातावरण बदलू लागले आणि आज सकाळपासूनच जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या तर देवगड, मालवण, वेंगुर्ला येथे हलक्या ते मध्यम सरी झाल्या.
दरम्यान, उद्या (ता.२७) पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असल्याने आज जिल्ह्यातील बाजारपेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. फळे, भाजीपाला व उत्सवाचे साहित्य विक्रेते रस्त्याकडेला दुकाने थाटून बसले होते. मात्र, पावसामुळे विक्रेते व ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी खरेदी अर्धवट सोडून घरी परतावे लागले. काही रस्ते चिखलमय झाल्याचेही चित्र दिसले. जिल्ह्यात पावसाचे सावट कायम राहण्याचे अंदाज असल्याने गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

चौकट
उद्यापर्यंत यलो अलर्ट
चार पाच दिवसानतंर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मात्र, या पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात गुरुवार (ता.२८) पर्यत येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही भागात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर पावसाचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.

चौकट
खड्ड्यांचा प्रश्न चिघळला
जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने काही मार्गांवरील खड्डे चिऱ्याच्या मुरुमाने भरले होते. मात्र, काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे हे खड्डे पुन्हा उखडून चिखल तयार झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com