
- rat२७p१.jpg-
P२५N८७४११
धनंजय चितळे
(२१ ऑगस्ट टुडे ३)
संतांचे संगती ------लोगो
श्रीगणेशांचे पोट मोठे आहे म्हणूनच त्यांना लंबोदर हे नाव प्राप्त झाले आहे. हे पोट काय शिकवते? एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका छोट्या मुलाने विचारले, महाराज तुमचे पोट मोठे का? त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘अरे माझे नाव गणपती आहे ना, म्हणून.’ या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले आणि तो खेळायला निघून गेला. त्यानंतर श्री महाराजांनी तेथे जमलेल्या लोकांना सांगितले, ‘आपल्याकडे येणाऱ्या भक्तांचे गुण आणि दोष संत पोटात घेतात, हे दाखवण्यासाठी त्यांचे पोट मोठे असते.’ (अर्थात, सर्व मोठ्या पोटाची माणसे संत नसतात, हे ध्यानात घ्यावे).
- धनंजय चितळे, चिपळूण
----
भक्तांचे गुण, दोष पोटात घेणारा लंबोदर
जगात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ज्या ग्रंथात आहेत, व्यक्तीमत्त्व विकास आणि नेतृत्वगुण विकास करण्यासाठीचा उत्तम मार्गदर्शक असा ज्या ग्रंथाचा लौकिक आहे त्या ग्रंथराज दासबोधातील श्रीगणेशस्तवनातील ध्यान
गणेशाचे वर्णिता । मती प्रकाश होय भ्रांता।।
गुणानुवाद श्रवण करिता । वोळे सरस्वती।।
या ओवीचा आपण विचार करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण या ओवीच्या आधारे श्री गणेशमूर्ती काय शिकवते, त्याचे चिंतन सुरू केले आहे. गेल्या भागात आपण श्रीगणेशांचे डोळे आणि कान काय शिकवतात, ते पाहिले. आता पुढील रूपाकडे पाहूया. श्रीगणेशांची सोंड ही महाकाय वृक्ष उपटून काढण्यास सक्षम आहे तशीच ती जमिनीवर पडलेली छोटी वस्तू उचलून घेण्यास उपयुक्त आहे. आपणही आपल्या स्वतःमध्ये आणि समाजामध्ये जे चुकीचे आहे, अनावश्यक आहे ते सामर्थ्य लावून उपटून काढले पाहिजे आणि जे छोटे आहे; पण हितकारक आहे ते स्वतःच्या आयुष्यात आणि समाजातही कष्टपूर्वक रूजवले पाहिजे.
श्री समर्थांनी दासबोधामध्ये सत्वगुणाची लक्षणे सांगताना म्हटले आहे,
पराव्याचे दोषगुण। दृष्टीस देखे आपण ।
समुद्रा ऐसी साठवण । करी तो सत्वगुण।।
श्रीगणेशांच्या तीन हातांमध्ये अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक या गोष्टी आहेत आणि चौथा हात आशीर्वाद देणारा आहे. आधी अंकुशाचा विचार करू. माणसाचे मन हे अतिचंचल असते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचे वर्णन करताना म्हटले आहे,
ते मन कैसेनि केवढे । पाहो जाता न सापडे ।
परी रहाटावया थोडे। त्रैलोक्य यया ।।
एका जागी बसलो असतानाही क्षणार्धात सर्वत्र फिरून येणारे हे मन आवरले नाही तर काय साध्य होणार? म्हणूनच त्या मनावर नियंत्रण ठेवणारा विवेकाचा अंकुश हवा. हत्ती हा महाकाय प्राणी आहे खरा; पण हत्तीवर बसलेला माहूत आपल्या हातातील छोट्याशा अंकुशाचे टोक हत्तीच्या मर्मस्थळावर टोचतो तेव्हा तो हत्तीसुद्धा नियंत्रणात राहतो तसेच महाबलवान असलेले मन विवेकाच्या टोचणीने ताळ्यावर राहते. मोदक म्हणजे आनंद निर्माण करणारा! मंगलमूर्ती श्रीगणेश हे दैवतच आबालवृद्धांना आनंद देणारे दैवत आहे. श्रीगणेश वर्षातून एकदा आपल्या घरी येतात तेव्हा आपण सारे किती आनंदी होतो ना? आणि जेव्हा त्यांच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा मनात किती कालवाकालव होते!
‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला,’ या काव्यदृष्टीने कमी प्रतीच्या ओळी असतील; पण भावदृष्टीने पाहिला तर सर्व गणेशभक्तांच्या भावना ओतप्रोत भरलेल्या या ओळी आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,’ हा घोषही भक्तजनांच्या भावनांचेच शब्दरूप आहे. श्रीगणेश करूणाष्टकात रचनाकार म्हणतात,
जातसे घडी पल युगापरी। लागली तुझी खंती अंतरी।।
स्वामि आपुला विरह साहिना। हे दयानिधे श्रीगजानाना ।।
ही विरह भावनाच सर्वांच्या मनात भरून गेलेली असते. आपल्या मोजक्या दिवसांच्या मुक्कामात संपूर्ण वातावरण उत्साही करणाऱ्या गणरायांप्रमाणेच गणेशभक्तांनी आपल्या कुटुंबात आणि समाजामध्ये आपल्या कृतीने आनंदच निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री गणेशांच्या वाहनाचा विचार केला नाही तर हे सगळे चिंतन अपूर्ण राहील. सतत कुरतडणारा उंदीर हे काळाचे प्रतीक आहे. काळ हा आपले आयुष्य असेच क्षणाक्षणाने कमी करत असतो. प्रत्येक माणसाची बुद्धी, संपत्ती वेगवेगळी असेल; पण सर्वांचा दिवस चोवीस तासांचाच असतो..जो वेळेचे योग्य नियोजन करतो तोच यशस्वी होतो, बरोबर ना? पाश हेही काळाचेच प्रतीक आहे. श्रीगणेश उपासना भक्ताला देहाचे अमरत्व देत नाही तर ही उपासना आपल्या कार्याने आपण लोकांच्या स्मरणात कसे राहावे हे शिकवणारी सद्बुद्धी मात्र नक्की देते. यासाठीच श्रीगणेशांना विनवणी करूया,
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे।
माथा शेंदूर पाझरे वरीवरे दुर्वांकुरांचे तुरे।
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ।।
।।गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया।।
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.