वर्षानुवर्ष प्रश्नांच्या गर्तेत अडकलेले रुळ

वर्षानुवर्ष प्रश्नांच्या गर्तेत अडकलेले रुळ

Published on

मालिकेचे नावः वैभववाडी रेल्वेस्थानकाचा हुंदका (भाग - १)

swt2721.jpg
87537
वैभववाडीः येथील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर छप्पर नसल्याने पावसात प्रवाशांची अशाप्रकारे गैरसोय होते.

लीड
कोकण रेल्वे झाल्यानंतर इथल्या विकासात मोठी भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती; मात्र रेल्वे कोकणातील दऱ्याखोऱ्यामधून धावून अनेक वर्षे उलटली तरी विकासापेक्षा प्रश्न आणि समस्याच जास्त चर्चेत आहेत. सिंधुदुर्गातील प्रत्येक स्थानकात समस्यांचा हा पाढा गेली कित्येक वर्षे वाचला जात आहे. वैभववाडीही याला अपवाद नाही. जिल्ह्यातील तीन आणि रत्नागिरी, कोल्हापूरमधील प्रत्येकी एक अशा तब्बल पाच तालुक्यांचे स्थानक असलेल्या वैभववाडीमधील समस्या मांडणारी वृत्तमालिका आजपासून....

वर्षानुवर्ष प्रश्नांच्या गर्तेत अडकलेले रुळ
समस्या जैसे थेः सोडविणुकीच्या पातळीवर कायम दुर्लक्षित
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ः कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी स्थानक हे कोकणातील इतर स्थानकांमध्ये सरासरी उत्पन्नात सरस आहे. तरीही हे रेल्वे स्थानक कायम दुर्लक्षित राहिले आहे. येथील समस्या ‘जैसे थे’ असून त्यामुळे पाच तालुक्यांतील प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे लागत आहे.
वैभववाडी, कणकवली, देवगड, गगनबावडा आणि राजापूर या पाच तालुक्यांतील प्रवाशी वैभववाडी रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी हे कोकणातील इतर स्थानकांच्या तुलनेत सरासरीत अव्वल आहे; परंतु सुरुवातीपासूनच या रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथे अनेक समस्या आहेत; मात्र त्या सुटण्याऐवजी त्यात वर्षागणीक भर पडताना दिसत आहे. येथील प्लॅटफॉर्मवर छप्पर नाही, प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही.
पावसाळ्यात तर भर पावसात रेल्वेत चढताना प्रवाशांची चांगलीच दमछाक होते. तालुक्यातील विविध पातळ्यांवर छप्पराची मागणी केली; परंतु कोकण रेल्वे प्रशासन कुणालाच जुमानत नाही. रेल्वे परिसरातील रस्त्यांची तर दुर्दशा झाली आहे. कोरोनापूर्वी वैभववाडी रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र कोटा होता, पण कोरोना कालावधीत या रेल्वे स्थानकातील तिकिट आरक्षणच बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटासाठी खासगी तिकिट केंद्र किंवा ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकात जावे लागते. स्थानकातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून त्याकडे देखील प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे.
कोकण रेल्वे प्रवाशी संघटना वैभववाडीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून येथील विविध समस्या कोकण रेल्वे प्रशासनाकडे ठामपणे मांडल्या जात आहेत. अलीकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली; परंतु कोणतेही ठोस आश्वासन ते देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात तरी या स्थानकातील समस्या सुटतील, असे आशादायक चित्र दिसत नाही.

चौकट
पादचारी पुलाचे लोकार्पण
वैभववाडी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून २ वर जाण्यासाठी पादचारी पूल मंजुर झाले. या पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले; परंतु ते पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट उजाडला. दोन-तीन दिवसांपूर्वी या पादचारी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. अनेक समस्यापैंकी एक समस्या बऱ्याच वर्षांनंतर मार्गी लागली आहे.

कोट
गेली दोन-तीन वर्षे आम्ही सतत कोकण रेल्वे प्रशासनाकडे वैभववाडी रेल्वे स्थानकातील समस्यांविषयी पत्रव्यवहार करीत आहोत. याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी आताच आमच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अजून दोन-तीन महिने प्रतीक्षा करू. त्यानंतर मात्र आंदोलन करावे लागेल.
- किशोर जैतापकर, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवाशी संघटना, वैभववाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com