रत्नागिरी-शाळांची अवस्था बघा...अन् मदतीचा हात द्या

रत्नागिरी-शाळांची अवस्था बघा...अन् मदतीचा हात द्या
Published on

८७५४६


कोटीचे केले दान... माझी पडकी शाळा दृष्टीस आण!
सामाजिक संदेश ः कुवारबावमधील वर्तक कुटुंबीयांचा प्रबोधनात्मक देखावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) देखाव्यातून सामाजिक संदेश दिला आहे. शालेय इमारतींची जीर्ण अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज, या देखाव्यातून मांडली आहे. त्यासाठी सढळ हस्ते मदत करा, असेही आवाहन केले आहे.
सणासुदीच्या काळात गणेशभक्त कोटींचे दान देवाच्या चरणी अर्पण करतात, हीच बाब लक्षात घेऊन वर्तक कुटुंबीयांनी एक वेगळाच विचार मांडला आहे. त्यांनी आपल्या देखाव्यातून गणेशभक्तांना शाळांच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आणि शिक्षणासाठीही मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामागील सूत्रधार संजय जगन्नाथ वर्तक म्हणतात, गणेशोत्सव हा भक्ती, सजावट आणि एकत्र येण्याचा काळ असतो; पण त्याचवेळी आपल्याला समाजासाठी काहीतरी करायची संधीही मिळते. म्हणूनच आम्ही यावर्षीच्या देखाव्यातून शाळांमधील मोडकळीस आलेल्या इमारती, गळकी छपरे, पडझड झालेली भिंती दाखवत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरात दान दिलंच पाहिजे; पण त्याचबरोबर शिक्षणासाठीही थोडं दान दिलं तर अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळू शकतं.


मदतीतील काही हिस्सा
शाळांना प्रसाद म्हणून द्या
या देखाव्यासाठी वापरलेली साहित्यसामग्रीही पर्यावरणपूरक आहे. रंगीबेरंगी; पण नैसर्गिक रंग, पुनर्वापर करता येतील, अशा वस्तू आणि प्लास्टिकमुक्त सजावट यामुळे देखाव्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरत आहे. गणेशभक्तांना उद्देशून वर्तक कुटुंबीयांचे आवाहन आहे, या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाच्या दर्शनास या आणि आमच्या सामाजिक संदेशालाही दाद द्या. आपण देवाला अर्पण करणाऱ्या दानाचा एक हिस्सा समाजातील गरजू शाळांसाठी द्याल तर तोच खरा ‘प्रसाद’ ठरेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com