कोट्यवधींच्या विकासकामांना कुडाळात वेग
87696
कुडाळ शहर विकासाच्या नव्या टप्प्याकडे
सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध; नगरपंचायतीच्या योजनांना गती
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः येथील नगरपंचायत येत्या काही महिन्यांत विकासाच्या नव्या वाटचालीकडे पाऊल टाकणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून नगरपंचायतीची नवीन भव्य इमारत, दुहेरी फुटपाथ असलेले रस्ते, कचरा प्रकल्प, वेंगुर्ले धर्तीवर भाजी व मच्छीमार्केट असे अनेक प्रकल्प राबवले जाणार आहेत.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी जानेवारीत पदभार स्वीकारल्यापासून सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे. शहरातील एसटी स्टँडजवळ उभारलेली लक्षवेधी भिंत आणि बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाइट्स यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. वाढत्या लोकसंख्या व वाहतुकीमुळे भविष्यातील रस्त्यांचे नियोजन, दुहेरी फुटपाथ आणि अपघात प्रतिबंध यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
कुडाळचा ऐतिहासिक घोडेबाव परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींशी जोडलेला आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास करून येथे अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच गणेश घाट विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन हा मोठा प्रश्न असून, त्यावर तोडगा म्हणून दीड कोटी रुपयांची आधुनिक कचरा गाडी उपलब्ध होणार आहे. दिल्ली येथे झालेल्या महापौर व नगराध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेत नगराध्यक्ष शिरवलकर यांना विशेष मान मिळाला. या परिषदेत ‘मिशन २०४७’ अंतर्गत कचरा व्यवस्थापन, मार्केट विकास आणि शहरांचे मेट्रोसिटीमध्ये रूपांतर या संदर्भात मार्गदर्शन मिळाले असून त्याचा उपयोग कुडाळच्या विकासात होणार आहे. नगरपंचायतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून 18 गुंठे जागेवर भव्य इमारत उभारली जाणार आहे. त्यात वेंगुर्ले धर्तीवर भाजी मार्केट आणि शॉपिंग गाळे असतील. येत्या दोन महिन्यांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्याचा शुभारंभ होणार आहे.
कोट
87697
कुडाळचा विकास सर्वांना विश्वासात घेऊनच साध्य केला जाईल. सेवाभावी संस्था, नागरिक व स्थानिक मंडळे यांच्यासोबत बैठक घेऊन नियोजनबद्ध काम सुरू आहे. कुडाळ पोलीस स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या दरम्यानचा रस्ता काँक्रीट करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच पोलीस स्टेशनजवळील त्रिकोणी जागा शहराचे आकर्षण ठरेल, यासाठीही नियोजन केले आहे.
- निलेश राणे, आमदार
कोट
87698
कुडाळ शहरात अनेक विकास कामे होत असतानाच कचरा प्रकल्प हा सुद्धा महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वांच्या सहकार्यातून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. ज्या राज्याने हा उपक्रम राबवला त्या राज्याचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
- प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.