सामूहिकतेतून जपलेली गणरायाची परंपरा
swt2811.jpg
87702
मळगावः येथील प्रसिद्ध माळीच्या घरातील राऊळ कुटुंबीयांचा श्री गणपती.
सामूहिकतेतून जपलेली गणरायाची परंपरा
माळीच्या घराचा गणेशोत्सवः सातशे वर्षाहून अधिक वर्षे साजरा करताहेत उत्सव
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २८ः मळगाव येथील माळीचे घर येथे सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक काळ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. सुमारे ८० हून अधिक कुटुंबे असलेल्या राऊळ कुटुंबियांच्या या सामूहिकतेतून यावर्षीही हा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जात आहे.
आपल्या लाडक्या गणरायाच्या उत्सवामध्ये परंपरा आणि भावनेची सुरेख सांगड घालून कोकण संस्कृतीचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम कोकणवासीयांनी केले आहे. सोनुर्लीतील श्री देवी माऊलीसह मळगाव येथील श्री देव रवळनाथ, भूतनाथ, मायापूर्वचारी, दोन पूर्वस या चार देवस्थानांसह गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असणारे माळीचे घर होय. येथील सातशे वर्षांची परंपरा लाभलेला आगळा गणेशोत्सव जिल्ह्यात प्रसिध्द आहे. हे पाचवे देवस्थान माळीच्या घरातील मानकरी व सर्व कुटुंबीय जागृकतेने जोपासत आहेत. गणेशोत्सवाची ही परंपरा या संस्कृतीची प्रचीती आणून देणारी आहे. उत्सवाच्या पूर्वतयारीपासून ते विसर्जनापर्यंत माळीच्या घरात साजरे होणारे भक्तिमय कार्यक्रम हे भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.
माळीचे घर परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास सहाशेच्या आसपास लोकवस्ती आहे. या कुटुंबियांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विभागलेली ही भावंडे होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सव अशा चार उत्सवांना एकत्र येतात. या तिन्ही उत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी या तिन्ही उत्सवांतील भेटीमध्ये केली जाते. ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली लहान मंडळी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात.
उत्सवासाठी शाडू मातीची गणेशमूर्ती राऊळ बांधवांतील ज्येष्ठ मंडळी आजही स्वतः बनवितात. लहान मुलांसह युवकही या कामात हातभार लावतात. गणेशमूर्तीचे रंगकाम चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, नजर (डोळे) चतुर्थीच्या पहाटेला पारंपरिक कारागिरांकडून दिली जाते, हे या गणपतीचे वैशिष्ट्य आहे. माळीच्या घरातील गणेशोत्सव सात दिवसांचा असतो. घराच्या गाभाऱ्यातही श्री गणेशाचीच मूर्ती असून सर्वजण एकत्र येऊन रोज सायंआरती करतात.
पहिल्या दिवशी गणरायांच्या प्रतिष्ठापनेनंतर वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो आणि यातूनच सामूहिक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय प्रत्येक कुटुंबाकडून आपल्या आवडीचाही नैवेद्य दाखविला जातो. उत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. गणपतीसमोर फुगड्या घालतात, सायंआरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे सातही दिवस घरात भक्तिमय वातावरण असते. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन केल्यानंतर सामूहिक भोजन घेऊन हे बांधव पुढच्या भेटीचे नियोजन करून आपापल्या कामासाठी मार्गस्थ होतात.
चौकट
एक नजर..
* चतुर्थीच्या पहाटेला साकारली जाते श्रींच्या मूर्तीची नजर
* मूर्तीचे रुप अखंडरित्या आहे तसेच
* आनंद सात नेवैद्यांचा, सामूहिक भोजनाचा
* मळगाव पंचक्रोशीत पाचवे मंदिर म्हणून सन्मान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.