बांद्यात मुसळधार पावसाने दाणादाण
87743
87744
87746
87745
बांद्यात मुसळधार पावसाने दाणादाण
तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरसदृश स्थितीने जनजीवन विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ : बांदा शहर आणि परिसरात काल (ता. २७) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री उशिरा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. शहरातील आळवाडी-कट्टा कॉर्नर हा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. व्यापारी तसेच स्थानिकांनी रात्रीच आपल्या दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविले.
काल दिवसभर बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. सततच्या पावसामुळे तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत रात्री मोठी वाढ झाली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नदीने इशारा पातळी गाठली. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. निमजगा येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदा-दाणोली रस्ता वाहतुकीस बंद होता. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
रात्री ९ नंतर पावसाचा जोर वाढल्याने नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. पाण्याचा वेग वाढल्याने नदीच्या पुराचे पाणी आळवाडी मच्छी मार्केट परिसरात शिरले. या ठिकाणी सातत्याने पाण्याचा वेग वाढत असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता सायरन वाजवून स्थानिकांना सतर्क केले. स्थानिक व्यापारी राकेश केसरकर यांनी श्री साईबाबा मठातील सायरन वाजवून पुराच्या धोक्याची कल्पना दिली. त्यामुळे स्थानिकांनी पूरस्थिती उद्भवण्याच्या पार्श्वभूमीवर दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली.
बांदा सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी आळवाडी येथे धाव घेत पूरस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिकांना सामान हलविण्यासाठी मदत केली. पहाटे साडेचार वाजेपर्यंत आळवाडी बाजारपेठेतील साईराज साळगावकर यांच्या दुकानापर्यंत पुराचे पाणी येऊन स्थिर झाले. पहाटे पाचनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. सकाळी आठनंतर पुराचे सर्व पाणी ओसरल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.