-झाडांसह फुलांतून साकारल्या आकर्षक रांगोळ्या
-rat२८p२८.jpg ः
२५N८७७२५
राजापूर ः तन्वी कोळेकर यांनी फुलांच्या रांगोळीतून साकारलेली विविधांगी श्री गणेशरूपे.
-----
झाडांसह फुलांतून साकारल्या आकर्षक रांगोळ्या
तन्वी कोळेकरांची कलाकुसर ; श्री गणेशाची देखणी रुपे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवानिमित्ताने पुष्परचनाकार तन्वी कोळेकर यांनी विविधांगी झाडांच्या फुलांचा खुबीने उपयोग करत काढलेल्या फुलांच्या रांगोळीच्या माध्यमातून श्री गणेशाची विविध रूपे साकारली आहेत. त्यांनी फुलांच्या रांगोळीतून काढलेल्या विविधांगी गणेशमूर्तींनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
धार्मिक, सांस्कृतिक उत्सवाच्या जोडीने सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबवणाऱ्या या गणेशोत्सव मंडळातर्फे स्थानिक कलाकारांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्याचा लाभ घेत यावर्षी शहरातील पुष्परचनाकार कोळेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी साजऱ्या केल्या जात असलेल्या गणेशोत्सवामध्ये विविधांगी गणेशरूपांच्या फुलांच्या रांगोळ्या काढल्या आहेत.
पारिजात, झेंडू, तगर, गुलाबपुष्प, गुलबक्षी आदी फुलांच्या पाकळ्या यांचा खुबीने वापर करत कोळेकर यांनी फुलांच्या रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळ्या काढण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांसोबत त्यांनी केळीच्या पानाचाही सदुपयोग केला आहे.
चौकट
रांगोळीतून साकारलेली श्री गणेशरूपे
श्री महागणपती, श्री गिरिजात्मक, श्री वरदविनायक, श्री बल्लाळेश्वर, श्री मयूरेश्वर, श्री चिंतामणी, श्री सिद्धिविनायक, श्री अष्टविनायक, श्री विघ्नेश्वर.
कोट
मला चित्रकलेची आवड असून, त्यातून अनेक चित्रे रेखाटली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी गणेशरूपातील विविध फुलांच्या रांगोळ्या काढल्या आहेत. फुलांच्या रांगोळ्यातून गणेशरूपे साकारताना तासनतास वेळ जातो. फुले एका ठिकाणी ठेवल्यानंतर ती स्थिर राहतात; मात्र, फुलांच्या कळ्या स्थिर राहत नसल्याने त्यासाठी कौशल्याचा अधिक वापर करावा लागतो. गणेशरूपातील फुलांच्या रांगोळ्या काढण्याची संधी दिल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विशेष धन्यवाद.
- तन्वी कोळेकर, पुष्परचनाकार