विद्यापीठ उपकेंद्राला हवी हक्काची जागा
swt2914.jpg
88010
सावंतवाडीः येथील पालिकेच्या याच इमारतीमध्ये सध्या मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे.
विद्यापीठ उपकेंद्राला हवी हक्काची जागा
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षः सध्या सावंतवाडीत भाड्याच्या जागेत कामकाज
रुपेश हिरापः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः येथे गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत सुरू असलेले मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग उपपरिसर केंद्र आजही कायमस्वरूपी जागेच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कथित दुर्लक्षामुळे हा प्रश्न रखडला असून, उपकेंद्रासाठी हक्काची जागा मिळावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी झाराप (ता. कुडाळ) येथे शासकीय जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची आवश्यकता भासल्याने झाराप येथील जमीन त्या प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात आली आणि सातबाऱ्यावरून मुंबई विद्यापीठाचे नाव वगळण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालय नंतर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सुरू झाले तरीही झाराप येथील जमीन आजही वैद्यकीय महाविद्यालयासाठीच आरक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित राहिला. यानंतर, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आंबोली येथे विद्यापीठ उपकेंद्रासाठी ५० एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात जमीन विद्यापीठाच्या ताब्यात न आल्याने काम ठप्प झाले. उपकेंद्र उभारण्यासाठी सुमारे २५ एकर जागेची गरज आहे. मात्र, सध्या हा प्रश्न रेंगाळलेला असून या संदर्भात काहीच हालचाली होताना दिसून येत नाही. सध्या या उपकेंद्रात २५० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कायमस्वरूपी जागा मिळाल्यास येथील शैक्षणिक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतील. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुनश्च प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे
--------------
चौकट
‘सागरी संशोधन’ला वेंगुर्ले येथे गती
वेंगुर्ले येथे मुंबई विद्यापीठाला नगरपरिषदेच्या मदतीने चार एकर जागा उपलब्ध झाली आहे. २०२२ मध्ये येथे सागरी संशोधन मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन झाले असून इमारतीचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती संचालक श्रीपाद वेलिंग यांनी दिली. कोकणाच्या सागरी किनाऱ्यामुळे संशोधनासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार असून, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मोठा लाभ होणार आहे.
कोट
मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी तब्बल २५ एकर जागेची आवश्यकता आहे. राजकीय नेत्यांकडून यासाठी प्रयत्न झाले होते; मात्र प्रश्न अजूनही रेंगाळलेला आहे. जागेचा प्रश्न सुटल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा व उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होईल.
- श्रीपाद वेलिंग, संचालक, मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.